अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. भारताने रशियाकडून तेलाची आयात अशीच सुरू ठेवल्यास वॉशिंग्टन भारतावर वाढीव आयात शुल्क (टॅरिफ) लादेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपली नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाऊक होती आणि आपल्याला आनंदी ठेवण्यासाठीच भारताने पावले उचलली, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
एअर फोर्स वन विमानातून प्रवास करताना रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "रशियन तेलाच्या मुद्द्यावर भारताने सहकार्य न केल्यास आम्ही त्यांच्यावर आयात शुल्क वाढवू शकतो."
भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी मोठ्या प्रमाणावर कमी केली असल्याचा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, "त्यांना मूळात मला खुश करायचे होते... पंतप्रधान मोदी अत्यंत चांगले आणि सज्जन व्यक्ती आहेत. माझी नाराजी त्यांना माहीत होती. मला आनंदी ठेवणे महत्त्वाचे होते. दोन्ही देशांत व्यापार होतो आणि आम्ही भारतावर खूप वेगाने आयात शुल्क वाढवू शकतो."
ट्रम्प यांच्या इशाऱ्याची वेळ
भारताने देशांतर्गत ऊर्जेची गरज आणि सुरक्षिततेसाठी रशियाकडून तेल खरेदी आवश्यक असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. तरीही वॉशिंग्टनमध्ये भारताच्या रशियासोबतच्या इंधन व्यापारावर बारीक नजर ठेवली जात असतानाच ट्रम्प यांनी हा नवीन इशारा दिला आहे. काही आठवड्यांपूर्वीच ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. आयात शुल्कावरून तणाव असूनही दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापारातील गती कायम राखण्यावर यावेळी भर दिला होता. त्यानंतर लगेचच ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारावरून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या चर्चेची नवीन फेरी सुरू असतानाच दोन्ही नेत्यांमध्ये ही बातचीत झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादल्याने त्यात अडथळे निर्माण झाले होते.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या व्यापार कराराच्या चर्चेदरम्यानच, भारतातील अमेरिकन दूतावासाने ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या कौतुकाचा संदर्भ नुकताच दिला होता. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी भारताचे वर्णन 'एक अद्भुत देश' असे केले असून मोदींच्या रूपाने अमेरिकेला 'एक चांगला मित्र' मिळाल्याचे म्हटले होते.
त्यांनी लिहिले होते, "भारत ही जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. हा एक अद्भुत देश असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेसाठी महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. पंतप्रधान मोदी आमचे खूप चांगले मित्र आहेत."