१२ वर्षांच्या कार्यकाळात भारताने अनुभवली सामाजिक क्रांती; पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींनी मांडले भारताचे चित्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारत आता जागतिक स्तरावर एक 'विश्वासार्ह भागीदार' (Trusted Partner) म्हणून वेगाने उदयाला येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पॅरिसमधील 'सॅले प्लेयेल' (Salle Playel) येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी भारताच्या गेल्या १२ वर्षांतील प्रवासाचा आणि जागतिक भूमिकेचा आढावा घेतला.

व्यापार आणि विश्वासाची सांगड

पॅरिसमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकेकाळी देशांमधील संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, पण आज व्यापारासोबतच 'विश्वास' (Trust) तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. "आज प्रत्येक देशाला एक विश्वासार्ह पुरवठा साखळी (Supply Chain) आणि स्थिर भागीदारी हवी आहे. अशा काळात जग भारताकडे एका भरवशाच्या भागीदाराच्या नजरेतून पाहत आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. जी-७ शिखर परिषदेतही भारताने जागतिक प्रशासनामध्ये समावेशकता आणि शाश्वत विकासाचा संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक परिवर्तनाचा प्रवास

पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळातील १२ वर्षांचा उल्लेख करत भारताच्या लोकशाहीची ताकद अधोरेखित केली. "एक चहावाला आज या पदापर्यंत पोहोचला आहे, ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे," असे ते म्हणाले. गेल्या १२ वर्षांत केवळ आर्थिक प्रगतीच नाही, तर सामाजिक परिवर्तनाची मोठी कथा भारताने लिहिली आहे. २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत, तर देशातील शेतकरी आणि महिला नव्या नेतृत्वाची धुरा सांभाळत असल्याचेही मोदींनी सांगितले.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत झाली असून, पुढील वर्षी प्रक्षेपित होणारा 'तृष्णा' (TRISHNA) उपग्रह जगभरातील पाणी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताची प्रगती ही केवळ भारताची नसून ती संपूर्ण जगाच्या विकासासाठी आणि भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.