वाशिंग्टन
अमेरिकन विद्यापीठांमधून पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतच नोकरी करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर १ लाख डॉलरचे (सुमारे ९६ लाख रुपये) भरमसाठ शुल्क आकारण्याचा विचार अमेरिकेत सुरू आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हा विचार चालवला असून, यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो. अमेरिकेने H-1B व्हिसावर असाच १ लाख डॉलरचा प्रस्ताव आणल्यानंतर तो न्यायालयात रद्दबातल ठरवण्यात आला होता, त्यानंतर आता हा नवीन विचार समोर आला आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) 'ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग' (OPT) या व्हिसावर हे उच्च शुल्क लागू करण्याचा विचार करत आहे. हा F-1 विद्यार्थी व्हिसाचाच एक भाग मानला जातो. OPT कार्यक्रमामुळे परदेशी पदवीधारकांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित क्षेत्रात एक ते तीन वर्षे अमेरिकेत राहून काम करण्याची मुभा मिळते. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये सुमारे ४ लाख १९ हजार परदेशी नागरिक या योजनेअंतर्गत काम करत होते.
या प्रस्तावावर बोलताना DHS च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही धोरणे अंतिम मानली जाऊ नयेत. कायदेशीर immigration प्रणालीची शुद्धता राखण्यासाठी विभाग सतत नवीन पर्यायांवर चर्चा करत असतो. H-1B आणि विद्यार्थी व्हिसा व्यतिरिक्त, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने देशाबाहेरील ग्रीन कार्ड अर्जदारांवर देखील १ लाख डॉलरचा बाँड जोडण्याचा विचार सुरू केला आहे, जो अर्जदार अमेरिकेत मुक्काम करून नागरिक झाल्यानंतरच रिडीम केला जाऊ शकतो.