भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार: २० अब्ज डॉलरची व्यापारवृद्धी, उद्योजकतेला चालना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार

 

भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार किमान २० अब्ज डॉलरने वाढण्यास मदत होणार असून, आर्थिक उलाढालींना चालना मिळेल, तसेच दोन्ही देशांमध्ये उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मत अनेक उद्योगपतींनी व्यक्त केले आहे.

या कराराबाबत टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, "या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापर २०३० पर्यंत ६० अब्ज डॉलरवरून १२० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची अपेक्षा असून, हे 'विकसित भारत' या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या पूर्ततेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर आपली उपस्थिती
वाढवण्याची मोठी संधी मिळेल. देशाच्या नवकल्पना व अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल. भारत सरकारच्या प्रमुख 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत भारतीय उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठा खुल्या करण्याची संधी निर्माण झाली असून, हा करार अत्यंत योग्य वेळी झाला आहे. 

टीव्हीएस मोटर कंपनीने नुकत्याच खरेदी केलेल्या प्रतिष्ठित ब्रिटिश अँड नॉर्टन मोटरसायकल्सची नवी श्रेणी यूकेमध्ये सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीनेदेखील हा करार अगदी योग्य वेळो झाला आहे, असेही वेणू यांनी म्हटले आहे. 

वेदांत लि.चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी हा ऐतिहासिक करार एक मोठी कामगिरी असल्याचे म्हटले आहे. हा दोन्ही देशांसाठी एक विजयी करार आहे. यामुळे आर्थिक व्यापाराला चालना मिळेल आणि दोन्ही देशांमध्ये अनेक नोकऱ्या आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील. गेल्या दोन दशकांमध्ये भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक संबंध लक्षणीयरीत्या वाढले आहेत. दोन्ही देश उत्तम भागीदार आहेत. या कराराने ही भागीदारी अधिक दृढ होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि एमडी डॉ. अनिश शाह म्हणाले, "भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करार एक परिवर्तनकारी घटना आहे. हा केवळ व्यापारासाठी नाही तर आधुनिक, मूल्यांवर आधारित भागीदारीचा यशस्वी आराखडा आहे. अशा सीमापार भागीदारीच्या सामर्थ्यांवर उब्ब-गुणवत्तेच्या नोकऱ्या निर्माण होतात. ग्रीन मोबिलिटी, स्वच्छ ऊर्जा ते डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रांमध्ये प्रगती वेगवान होते. हा करार जागतिक व्यवस्थेत एक विश्वासार्ह भागीदार आणि नवोपक्रम शक्तीशाली केंद्र म्हणून भारताच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा आहे."