"आम्ही गाझा शहरावरील हल्ला अधिक तीव्र करत आहोत," नेतन्याहूंनी दिली माहिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी जाहीर केले की, इस्रायली लष्कर गाझा शहरावरील आपले हल्ले अधिक तीव्र आणि खोलवर नेत आहे. हमासचा प्रमुख प्रवक्ता अबू ओबेदा याला ठार मारल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच, नेतन्याहू यांनी ही नवी घोषणा केली आहे, ज्यामुळे गाझामधील संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एका निवेदनात, पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, "आमचे सैन्य गाझा शहरातील हमासच्या तळांवर आपले हल्ले अधिक तीव्र करत आहेत. हमासला पूर्णपणे नष्ट करणे आणि आमच्या सर्व ओलिसांना परत आणणे, हे आमचे अंतिम ध्येय आहे."

इस्रायली लष्करानेही याला दुजोरा दिला आहे. लष्कराने सांगितले की, त्यांचे सैनिक गाझा शहरातील झेतुन (Zeitun) यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कारवाई करत आहेत, जे हमासचे बालेकिल्ले मानले जातात.

ही कारवाई अशा वेळी होत आहे, जेव्हा इस्रायलने नुकतेच गाझा शहराला 'युद्धक्षेत्र' (combat zone) घोषित करून, तेथील लाखो नागरिकांना दक्षिणेकडे स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते. इस्रायलच्या या आक्रमक भूमिकेमुळे गाझामधील मानवतावादी संकट अधिकच गडद झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच हमासने अरब देशांनी मध्यस्थी केलेला युद्धविराम प्रस्ताव स्वीकारला होता. मात्र, इस्रायलच्या या नव्या भूमिकेमुळे शांतता चर्चेचे भवितव्य धोक्यात आले आहे. आता या वाढत्या लष्करी कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदाय काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.