"मोहम्मद पैगंबरांच्या शहराने मला सर्वकाही दिले आहे. मी न मागता मला सर्व मिळाले आणि माझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाली. मी या पवित्र भूमीला मनापासून नमन करतो. मी एक हिंदू असलो तरी या भूमीचा मला प्रचंड आदर वाटतो."
हे शब्द आहेत एका भारतीय हिंदू ड्रायव्हरचे. गेल्या आठ वर्षांपासून तो सौदी अरेबियामध्ये ड्रायव्हर म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तिथे तो सुखी आयुष्य जगत असून भारतात आपल्या कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय आनंदाने पूर्ण करत आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हारयल होत आहे. यात दोन ड्रायव्हर मदिनेजवळ एकमेकांशी संवाद साधत आहेत. त्यांचा हा संवाद बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
या व्हिडिओमध्ये युट्युबर असलेला ड्रायव्हर महफूज हा विनोदची ओळख करून देतो. विनोद मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा आहे. महफूज सांगतो की, "भाऊ असावा तर विनोदसारखा. गेल्या आठ वर्षांपासून तो सौदीत आहे. त्याचे वय जास्त असूनही त्याने अजून स्वतःचे लग्न केलेले नाही. त्याने कमावलेला प्रत्येक रियाल आपल्या कुटुंबावर खर्च केला. स्वतः अविवाहित राहून त्याने आपल्या बहिणीचे आणि लहान भावांचे लग्न लावून दिले. यालाच म्हणतात जबाबदारीची जाणीव असणे."
या संवादात विनोद म्हणतो, "मला विशेषतः माझ्या सर्व बांधवांना हे सांगायचे आहे की, मोहम्मदच्या शहरात जो कोणी प्रामाणिकपणे राहतो, त्याला देव ते सर्वकाही देतो जे त्याने कधी मागितलेही नसेल. मला याचा अनुभव आहे. या भूमीवर देवाची मोठी कृपा आहे. जर तुम्ही या धरतीला मनापासून वंदन केले, तर ती तुम्हाला भरभरून देते. माझ्या आयुष्यात गेल्या आठ वर्षात जे काही मी मागितले, ते सर्व या शहराने मला दिले आहे."
विनोद पुढे सांगतो की, हिंदू असूनही तो मदिनेला जाऊन आला आहे. लोक म्हणतात की तिथे हिंदू जाऊ शकत नाहीत, पण तो स्वतः आपल्या मालकिणीसोबत मदिनेला गेला होता. तिथे पोहोचल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला आत जाण्यापासून रोखले, तेव्हा त्याच्या मॅडमने पोलिसांशी तासभर वाद घातला. त्या म्हणाल्या, "गेला तर हाच ड्रायव्हर जाईल, नाहीतर आम्ही सर्वजण परत जाऊ." शेवटी त्या पोलिसाने कंटाळून आम्हाला आत जाऊ दिले.
"मी मदिनेच्या गल्ल्यांमध्ये ड्रायव्हिंग केले आहे. तिथे मला कधीच कोणाचा त्रास झाला नाही. वास्तविक मदिनेत बिगर मुस्लिमांना जाण्यास बंदी असते, तरीही देवाची कृपा म्हणून मी तिथे फिरून आलो. या शहराने मला खूप काही दिले आहे, मी आयुष्यभर या भूमीला वंदन करत राहीन," असे विनोद भावनिक होऊन सांगतो.
या व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणतो की, त्याला या मातीवर एखाद्या मुलाचे आपल्या आई-वडिलांवर असते तसे प्रेम जडले आहे. रमजानच्या महिन्यात तो मुलांकडून जेवण आणि पाणी मागवून ते लोकांना वाटतो. तिथल्या मशिदीतील सौदी व्यवस्थापक सुद्धा त्याला पाहून आदराने सलाम करतात आणि लोकांना जेवण देण्यास सांगतात. तो स्वतः आपल्या हाताने तिथे अन्नदान करतो.
विनोदने तिथे राहून खूप पैसा कमावला, स्वतःचे घर बांधले आणि शेतीही घेतली. तीन बहीण-भावांची लग्ने केली आणि आता आपल्या मुलांचे संगोपन करत आहे. कुटुंबाची प्रत्येक जबाबदारी तो खंबीरपणे निभावत आहे. "या मातीचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, मी आयुष्यभर तिला नमन करत राहीन," असे तो शेवटी अभिमानाने सांगतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -