इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता एका अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचला आहे. मंगळवारी (३ मार्च २०२६) रात्री उशिरा दुबई, दोहा आणि अबु धाबी यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्फोटांचे प्रचंड आवाज ऐकू आले. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना आणि महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करत आपली 'प्रतिशोध' मोहीम अधिक तीव्र केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील अमेरिकन दूतावासाजवळ (US Consulate) एका ड्रोन हल्ल्यामुळे भीषण आग लागली होती. दुबई प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ऐकू आलेले आवाज हे हवाई संरक्षण यंत्रणेने (Air Defence) शत्रूची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केल्यामुळे झाले होते. "दुबईतील सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत," असे दुबई मीडिया ऑफिसने स्पष्ट केले आहे.
दोहामधील अमेरिकन तळावर हल्ला
कतारची राजधानी दोहा देखील या युद्धाच्या झळांपासून वाचू शकलेली नाही. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दोहाजवळील 'अल-उदैद' (Al-Udeid) या अमेरिकन लष्करी तळावर धडकले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. हवाई संरक्षण यंत्रणेने दुसरे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले, ज्याचे अवशेष निवासी भागात पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.
इराणचा 'ओपन गेट्स ऑफ हेल' इशारा
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) उघडपणे धमकी दिली आहे की, जर अमेरिका आणि इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवले नाहीत, तर आखाती देशांमधील सर्व आर्थिक केंद्रे उद्ध्वस्त केली जातील. "जर आमच्या मुख्य केंद्रांवर हल्ला झाला, तर आम्ही या प्रदेशातील सर्व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करू. नरकाचे दरवाजे आता अधिक उघडले जातील," असा इशारा इराणच्या जनरलने दिला आहे. इराणने आधीच होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद केल्याचे घोषित केले आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
हवाई वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम
या युद्धामुळे आखाती देशांतील हवाई क्षेत्र (Airspace) बंद करण्यात आले असून, आतापर्यंत १२,९०३ पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे, तिथे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. प्रशासनाने प्रवाशांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले असून केवळ कंफर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे.
भारतासह अनेक देशांनी या युद्धावर चिंता व्यक्त केली असून, रमजानच्या पवित्र महिन्यात हा संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "आता चर्चेसाठी खूप उशीर झाला आहे" असे विधान केल्यामुळे हे युद्ध अधिक काळ चालण्याची चिन्हे आहेत.