अमेरिकी हल्ल्यानंतर इराणच्या बुडणाऱ्या 'IRIS Dena'साठी भारतीय नौदलाची समुद्रात धाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

हिंदी महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्धनौका 'आयआरआयएस देना' (IRIS Dena) बुडवल्यानंतर भारतीय नौदलाने एक मोठी बचाव मोहीम हाती घेतली आहे. श्रीलंकेच्या सागरी हद्दीजवळ ही घटना घडली असून, इराणच्या या नौकेने दिलेल्या 'डिस्ट्रेस कॉल'ला (संकटसमयीचा संदेश) भारताने तत्परतेने प्रतिसाद दिला आहे.

भारतीय नौदलाने गुरुवारी (५ मार्च २०२६) स्पष्ट केले की, कोलंबो येथील मेरिटाइम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरकडून (MRCC) माहिती मिळताच भारताने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. भारताने आपली आधुनिक पाळत ठेवणारी विमाने आणि युद्धनौका या मोहिमेत उतरवल्या आहेत.

विमाने आणि जहाजांची तैनात

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी सकाळी १० वाजताच लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान (P8I) शोधकार्यासाठी रवाना करण्यात आले. श्रीलंकेच्या नौदलाला मदत करण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले. याशिवाय, जीवरक्षक बोटी (Life Rafts) असलेले दुसरे एक विमानही तातडीच्या मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.

केवळ विमानेच नाही, तर नौदलाचे प्रशिक्षण जहाज 'आयएनएस तरंगिणी' हे त्या परिसरातून जात असताना त्याला तातडीने बचाव कार्यात सामील होण्याचे आदेश देण्यात आले. तरंगिणीने ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत शोध मोहिमेच्या ठिकाणी पोहोचून मदत कार्य सुरू केले. याव्यतिरिक्त, कोचीहून 'आयएनएस रक्षक' (INS Ikshak) हे जहाजही बेपत्ता खलाशांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.

भारताचा पाहुणा संकटात

विशेष म्हणजे, बुडलेली 'आयआरआयएस देना' ही युद्धनौका नुकतीच विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या 'मिलन २०२६' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन मायदेशी परतत होती. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या नौकेचा उल्लेख 'भारताचा पाहुणा' असा केला आहे. ही नौका आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात असताना तिच्यावर हल्ला झाला, ज्यामुळे सुमारे ८० खलाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

मानवतावादी दृष्टिकोन

भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून राबवली जात आहे. श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत ३२ इराणच्या खलाशांना वाचवले आहे, तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी भारतीय नौदल श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरात भारताची ही सक्रिय भूमिका सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.