इराणमधील आंदोलकांचा नरसंहार थांबल्याचा ट्रम्प यांचा दावा; ३,४०० हून अधिक मृत्यूंची भीती

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
आंदोलकांच्या मृतदेहांचा खच
आंदोलकांच्या मृतदेहांचा खच

 

इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनांनी आता अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, या दडपशाहीत आतापर्यंत ३,४२८ हून अधिक लोकांचा बळी गेल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लष्करी कारवाईचा गंभीर इशारा दिला होता. मात्र, ताज्या घडामोडींनुसार ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणमधील आंदोलकांची कत्तल थांबली असून प्रस्तावित फाशीच्या शिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, "मला खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, इराणमधील हत्याकांडाचे सत्र आता थांबले आहे. आज होणाऱ्या अनेक फाशीच्या शिक्षाही रोखण्यात आल्या आहेत." तरीही, अमेरिकेने इराणवरील आपले लक्ष कमी केलेले नाही. लष्करी कारवाईचा पर्याय अद्याप खुला आहे का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि पुढील प्रक्रिया काय होते ते पाहू."

दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांच्या दाव्याला एक प्रकारे दुजोरा दिला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "आज किंवा उद्या कोणतीही फाशी दिली जाणार नाही." मात्र, अराघची यांनी या संपूर्ण हिंसाचाराचे खापर इस्रायलवर फोडले आहे. त्यांच्या मते, आंदोलकांमध्ये घुसलेल्या काही 'बाहेरच्या शक्तींनी' जाणीवपूर्वक हिंसाचार घडवून आणला, जेणेकरून अमेरिकेने इराणवर हल्ला करावा.

इराणमध्ये सध्या इंटरनेट पूर्णपणे बंद असून या काळात प्रशासनाने अत्यंत क्रूरपणे आंदोलने दडपल्याचा आरोप ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. काही व्हिडिओ पुराव्यांमध्ये तेहरानच्या दक्षिणेकडील कहरीझक शवागारात मृतदेहांचा खच पडल्याचे दिसत असून, हताश नातेवाईक आपल्या प्रियजनांना शोधत असल्याचे हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा आर्थिक निर्णयही जाहीर केला आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेसोबतच्या व्यवहारावर २५ टक्के अतिरिक्त कर (टॅरिफ) भरावा लागेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आज (१५ जानेवारी) इराणमधील परिस्थितीवर विशेष चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहे.