इराणने पश्चिम आशियातील ॲपल आणि गुगल सारख्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कडक भूमिका घेत म्हटले की, तेहरानकडून होणारा कोणताही संभाव्य हल्ला रोखण्यासाठी अमेरिकन लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्हाईट हाऊस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "इराणकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकन लष्कर आजही सज्ज आहे आणि यापूर्वीही होते. दहशतवादी राजवटीने केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले ९० टक्क्यांनी कमी झाले आहेत, हाच याचा मोठा पुरावा आहे."
इराणचा इशारा
इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने (IRGC) हा इशारा दिला आहे. जर इराणच्या आणखी नेत्यांच्या लक्ष्यित हत्या झाल्या, तर अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. गार्ड्सनी एका निवेदनात १८ कंपन्यांची नावे जाहीर केली असून या कंपन्या इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येत सामील असल्याचा आरोप केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, "या कंपन्यांनी बुधवारी, १ एप्रिल रोजी तेहरानच्या वेळेनुसार रात्री ८:०० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार रात्री १०:००) इराणमधील प्रत्येक हत्येच्या बदल्यात त्यांच्या संबंधित युनिट्सचा विनाश होण्यासाठी तयार राहावे."
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, "आम्ही या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तातडीने कामाची ठिकाणे सोडण्याचा सल्ला देतो." अमेरिकन सरकार आणि या टेक कंपन्यांनी उच्चपदस्थ इराणी अधिकाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या मोहिमा थांबवण्याच्या आमच्या वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप गार्ड्सनी केला. या टेक कंपन्या हत्येच्या लक्ष्यांची रचना आणि मागोवा घेणारा मुख्य घटक आहेत, असा इराणचा दावा आहे.
यामुळे १८ कंपन्यांना आता इराणच्या सूडाचा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकलसह इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला, ॲनालिटिक्स फर्म पॅलांटिर आणि चिप दिग्गज एनव्हिडिया यांचा समावेश आहे. "दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक लक्ष्यित हत्येसाठी प्रत्युत्तरादाखल कारवाईला सामोरे जावे लागेल," असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
ही कारवाई नेमकी कुठे केली जाईल हे स्पष्ट करण्यात आले नाही, मात्र निवेदनात पुढे म्हटले आहे की, "या प्रदेशातील सर्व देशांमधील या दहशतवादी कंपन्यांच्या सभोवतालच्या रहिवाशांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी एक किलोमीटरच्या परिघातून बाहेर पडावे आणि सुरक्षित ठिकाणी जावे."
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष संपवण्यासाठी आपण राजनैतिक प्रयत्न करत असल्याचे म्हटले असले तरी, त्याच वेळी त्यांनी इस्लामिक प्रजासत्ताक विरुद्ध अमेरिका-इस्रायली मोहीम अधिक तीव्र करण्याची धमकीही दिली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा नवीन धोका समोर आला आहे.