PM Modi UAE Visit : पंतप्रधान मोदींचा युएई दौरा यशस्वी;युएई भारतात करणार ५ अब्ज डॉलरची गुंतवणुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 51 m ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान

 

पश्चिम आशियातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान केले. 

पंतप्रधान मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा असलेल्या युएईमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यासह ७ प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारीचे करार करण्यात आले. या भेटीदरम्यान युएईने भारतात ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची मोठी घोषणा देखील केली आहे.

युएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध
पंतप्रधान मोदींचे अबुधाबी विमानतळावर राष्ट्राध्यक्ष अल नाह्यान यांनी स्वतः स्वागत केले आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. द्विपक्षीय बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी युएईवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे युएईला लक्ष्य केले जाणे हे अजिबात स्वीकारार्ह नाही, असे सांगत मोदींनी या कठीण परिस्थितीत युएईने संयम राखल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या संघर्षाचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवत असून शांततेसाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा सुरक्षा आणि ७ ऐतिहासिक करार
भारत आणि युएई दरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारीला गती देण्यासाठी ७ महत्त्वाचे करार झाले आहेत. भारताची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी 'इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज लिमिटेड'ने अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीसोबत धोरणात्मक सहकार्य करार केला आहे. यामुळे भारताचा पेट्रोलियम साठा वाढवण्यास आणि एलएनजी व एलपीजी साठवणुकीसाठी मदत होणार आहे. 

स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेता भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय गुजरातच्या वाडिनार येथे जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणे, तंत्रज्ञान आणि एआय विकासासाठी सुपरकॉम्प्युटर क्लस्टर उभारणे आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी विशेष फ्रेमवर्कवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 
सुमारे अडीच तासांचा संक्षिप्त मुक्काम आटोपून पंतप्रधान मोदी नेदरलँड्सकडे रवाना झाले. निघताना त्यांनी सोशल मीडियावरून या भेटीचा आढावा घेतला. "माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासोबत भारत-युएई संबंधांवर अत्यंत फलदायी चर्चा झाली. या भेटीचे परिणाम दोन्ही देशांच्या मैत्रीला आणि समृद्धीला नवीन उंचीवर नेतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युएईच्या या दौऱ्यामुळे आखाती देशांमधील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारताची मुत्सद्देगिरी अधिक मजबूत झाली आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter