इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्यावर कोणताही हल्ला झाल्यास, ती इराणविरुद्ध थेट 'युद्धाची घोषणा' मानली जाईल, असा कडक इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी रविवारी (१८ जानेवारी) दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खमेनी यांची हत्या करण्याचा किंवा त्यांना सत्तेवरून हटवण्याचा विचार करत असल्याच्या चर्चेला उत्तर म्हणून हे वक्तव्य आल्याचे मानले जात आहे.
पेझेशकियान यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "आमच्या देशाच्या महान नेत्यावर झालेला हल्ला हा इराणशी पूर्ण क्षमतेने युद्ध पुकारल्यासारखे असेल."
अमेरिकेवर संताप
इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनांसाठी पेझेशकियान यांनी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. या आंदोलनांमध्ये आतापर्यंत ५,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. "इराणी जनतेच्या जीवनात अडचणी आणि निर्बंध असतील, तर त्याचे मुख्य कारण अमेरिकन सरकार आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी लादलेली दीर्घकाळाची शत्रुत्व आणि अमानवी निर्बंध हेच आहेत," असे पेझेशकियान यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचा 'रेड लाईन' ओलांडणारा इशारा शनिवारी 'पोलिटिको'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी खमेनी यांची जवळपास ४० वर्षांची राजवट संपवण्याचे आवाहन केले होते. खमेनी यांना "आजारी माणूस" संबोधत त्यांनी "आपला देश नीट चालवा आणि लोकांना मारणे थांबवा," असा सल्ला दिला होता.
निदर्शनांचे हिंसक वळण
इराणमध्ये २८ डिसेंबरपासून महागाई आणि कोसळणाऱ्या चलनावरून सुरू झालेल्या निदर्शनांनी आता सरकारविरोधी स्वरूप धारण केले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने ८ जानेवारीपासून इंटरनेट आणि फोन सेवा जवळपास पूर्णपणे बंद केली होती.
गेल्या मंगळवारी ट्रम्प यांनी इराणी जनतेला निदर्शने सुरू ठेवण्याचे आणि "तुमच्या संस्था ताब्यात घेण्याचे" आवाहन केले होते. तसेच "मदत येत आहे," असे सांगत इराणवर हल्ल्याचे संकेत दिले होते.
युद्धाच्या उंबरठ्यावर
बुधवारी अमेरिका इराणवर लष्करी हल्ला करण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती, परंतु वाढत्या राजनैतिक दबावामुळे ट्रम्प यांनी माघार घेतल्याचे समजते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीही ट्रम्प यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचे 'एक्सिओस'ने म्हटले आहे. इस्रायल इराणच्या प्रत्युत्तरासाठी तयार नसल्याचे नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितल्याचे वृत्त आहे.
फाशीची शिक्षा आणि मानवाधिकार
ट्रम्प यांनी शुक्रवारी एका पोस्टमध्ये दावा केला की, त्यांच्या दबावामुळे इराणने ८०० लोकांची नियोजित फाशी थांबवली आहे. यामध्ये इरफान सोलतानी (२६ वर्षे) या पहिल्या आंदोलकाचा समावेश होता, ज्याला मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. इरफानच्या कुटुंबीयांनी तो जिवंत असल्याची पुष्टी केली आहे, मात्र त्याच्यावर कोठडीत अत्याचार झाल्याची भीती व्यक्त केली आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईत आतापर्यंत २४,३४८ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तसेच निदर्शनांमध्ये ५०० सुरक्षा रक्षकांसह ५,००० लोकांचा बळी गेला आहे.