ब्रिटनसमोर इस्लामिक कट्टरवादाचे मोठे आव्हान

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
मुस्लिम मुली
मुस्लिम मुली

 

 काश्‍मीरच्या मुद्द्यावरून ब्रिटनमधील मुस्लिमांची दिशाभूल करून त्यांना कट्टरतावादाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात देण्यात आला आहे. इस्लामिक कट्टरतावाद हे ब्रिटनसमोरील मोठे आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी सरकारने आपल्या धोरणामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे, अशी शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे. तसेच, या अहवालात खलिस्तानवादी कट्टरतावाद्यांपासूनही धोका शक्य आहे, असा इशारा देण्यात आला आहे.


ब्रिटन सरकारच्या नियुक्ती विभागाचे आयुक्त विल्यम शॉक्रॉस यांनी सरकारच्या दहशतवादविरोधी धोरणांचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतविरोधी भावना, विशेषत: जम्मू काश्‍मीरच्या मुद्दा पेटवायचा असताना पाकिस्तानकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे ब्रिटनमधील मुस्लिमांना चिथावणी मिळते, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. ‘काश्‍मीरबाबत प्रक्षोभक विधाने करणारे आणि धर्मनिंदेच्या मुद्द्यावर कडक नियम आखण्याची मागणी करणारे यांना जोडणारे काही समान घटक आहेत. ब्रिटनमधील कट्टरतावादी तसेच, ब्रिटनमध्ये समर्थक असलेल्या पाकिस्तानी धर्मगुरुने, काश्‍मीरमध्ये हिंसाचार घडवून आणण्याची चिथावणी दिल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. काश्‍मीरमधील घडामोडींमध्ये ब्रिटनमधील इस्लामवाद्यांना बराच रस असल्याचेही दिसून आले आहेम’ असे शॉक्रॉस यांनी अहवालात म्हटले आहे.


धोका वाढणार

येत्या काही वर्षांमध्ये इस्लामिक कट्टरतावादाचा धोका आणखी वाढणार असल्याचा इशारा अहवालात दिला आहे. दहशतवादी कारवायांसाठी ब्रिटनमध्ये अटक करण्यात आलेले अनेक जण काश्‍मीरमध्ये काही काळ सक्रिय होते, असे आढळून आले आहे. तसेच, यापैकी काही जणांनी अल कायदा संघटनेतही सहभाग घेतल्याचे पुरावे आहेत, असे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने त्यांच्या ‘प्रीव्हेंट’ या धोरणात सुधारणा करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.


खलिस्तानवाद्यांपासून सावध

ब्रिटनमधील शीख समुदायामध्ये खलिस्तानसाठी असलेले समर्थन वाढत असल्याकडेही लक्ष द्यावे, असा सल्ला विल्यम शॉक्रॉस यांनी अहवालाद्वारे दिला आहे. बोटांवर मोजण्याइतक्या खलिस्तानवादी गटांकडून चुकीच्या माहितीचा प्रचार केला जात आहे. असे गट हिंसाचाराचे उदात्तीकरण करतात. सध्या या गटांपासून फारसा धोका नसला तरी त्यांचा हिंसाचारावर असलेला विश्‍वास पाहता त्यांच्यापासूण भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.