इस्रायल-पाकिस्तानमध्ये वाकयुद्ध; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या एका पोस्टमुळे शांतता प्रक्रियेला बसला धक्का?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

 

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे एक मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. इस्रायलने या विधानांचा तीव्र निषेध केला असून त्यांना 'अत्यंत संतापजनक' म्हटले आहे. या विखारी विधानांमुळे मध्य पूर्व आशियातील तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर इराण-अमेरिका शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. त्यांनी इस्रायलचा उल्लेख "मानवतेसाठी असलेला शाप" आणि "एक दुष्ट राज्य" असा केला होता. इतकेच नाही तर, "ज्यांनी युरोपमधील ज्यूंपासून सुटका मिळवण्यासाठी पॅलेस्टाईनच्या जमिनीवर हे कर्करोगासारखे राज्य निर्माण केले, ते नरकात जळतील," असे अत्यंत विखारी शब्द त्यांनी वापरले होते.

इस्रायलचे चोख प्रत्युत्तर

या विधानानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने (PMO) कठोर शब्दांत निवेदन प्रसिद्ध केले आहे. "इस्रायलच्या विनाशाचे आवाहन कोणतेही सरकार करू शकत नाही, विशेषतः ते सरकार जे स्वतःला शांततेसाठी मध्यस्थ म्हणून मिरवत आहे. हे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही," असे या निवेदनात म्हटले आहे.

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साअर यांनीही ख्वाजा आसिफ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी या विधानांना "ज्यूविरोधी रक्तलांछन" (Antisemitic blood libel) असे संबोधले. "एक देश शांततेसाठी मध्यस्थी करण्याचे ढोंग करत आहे आणि त्याचेच मंत्री इस्रायलचा उल्लेख 'कर्करोग' म्हणून करत आहेत. स्वतःचा विनाश इच्छिणाऱ्या दहशतवाद्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास इस्रायल समर्थ आहे," असे साअर यांनी ठामपणे सांगितले.

शांतता चर्चेवर साशंकतेचे सावट

हा वाद अशा वेळी निर्माण झाला आहे, जेव्हा पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांची तात्पुरती शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा केला आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांत इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत. मात्र, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या 'तटस्थ मध्यस्थ' असण्यावर आता जगभरातून संशय व्यक्त केला जात आहे.

ख्वाजा आसिफ यांनी आपल्या पोस्टमध्ये गाझा, इराण आणि लेबनॉनमधील युद्धाचा संदर्भ देत इस्रायलवर 'नरसंहार' (Genocide) केल्याचा आरोपही केला होता. मात्र, त्यांच्या या विखारी भाषेमुळे निर्माण झालेला हा नवा राजनैतिक पेच शांतता प्रक्रियेत मोठा अडथळा ठरू शकतो.