इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. रविवारी (१ मार्च २०२६) इस्रायली हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानच्या उत्तरेकडील भागात असलेल्या गांधी रुग्णालयावर थेट हल्ला केला. अमेरिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (किंवा ऑपरेशन रोअरिंग लायन) या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी हा अंगावर काटा आणणारा हल्ला झाला आहे.
इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'आयएसएनए'ने (ISNA) या हल्ल्याचे वर्णन 'झिओनिस्ट-अमेरिकन हवाई हल्ला' असे केले आहे. इराणमधील इतर वृत्तसंस्थांनी रुग्णालयातील दृश्यांचे काही व्हिडिओ प्रसारित केले आहेत. यामध्ये रुग्णालयाच्या आत सगळीकडे काचांचे आणि सिमेंटचे ढिगारे साचलेले दिसत असून, व्हीलचेअर्स विखुरलेल्या अवस्थेत आहेत. विशेषतः नर्स आपल्या हातांत लहान मुलांना (नवजात अर्भके) घेऊन सुरक्षित ठिकाणी धावतानाचे दृश्य अत्यंत विदारक आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यात गांधी रुग्णालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर तातडीने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. हे हल्ले केवळ या रुग्णालयापुरते मर्यादित नव्हते, तर तेहरानच्या मध्यवर्ती भागातही अनेक स्फोट झाले. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) स्पष्ट केले आहे की, त्यांचे लक्ष्य इराणची लष्करी आणि अणुऊर्जा केंद्रे आहेत, मात्र या हवाई हल्ल्यांत नागरी वस्त्या आणि रुग्णालयालाही मोठा तडाखा बसला आहे.
या हल्ल्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. त्यामुळे चिडलेल्या इराणनेही इस्रायल, अमेरिकेचे आखाती देशांतील लष्करी तळ, सौदीची राजधानी आणि दुबईच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. दुबईच्या आकाशात धुराचे लोट दिसत असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.
इस्रायलच्या संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, त्यांनी तेहरानमधील सरकारी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी १०० लढाऊ विमाने एकाच वेळी तैनात केली होती. यामध्ये इराणचे हवाई दल, क्षेपणास्त्र कमांड आणि अंतर्गत सुरक्षा दलांच्या इमारतींचा समावेश होता. मात्र, गांधी रुग्णालयासारख्या नागरी सुविधेवर झालेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला असून यामुळे निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.