इराणच्या सर्वोच्च नेत्याचा विजयाचा हुंकार; अमेरिका- इस्राइलला भरला सज्जड दम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी
इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी

 

इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धात इराणचा 'निर्णायक विजय' झाल्याची घोषणा केली आहे. त्यांचे वडील आणि माजी सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनाला ४० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी हे विधान केले आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात शत्रू राष्ट्रांना कडक शब्दांत इशारा दिला असून झालेल्या हानीची भरपाई घेण्याची शपथ घेतली आहे.

विशेष म्हणजे, हे निवेदन अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर झाली असून शांततेसाठी वाटाघाटी सुरू आहेत.

काय म्हणाले मोज्तबा खामेनी?

मोज्तबा खामेनी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "इराणच्या जनतेने अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळवला आहे. आम्ही कधीही युद्ध इच्छित नव्हतो, पण आम्ही आमच्या राष्ट्राच्या अधिकारांशी कधीही तडजोड करणार नाही. आम्ही संपूर्ण 'प्रतिरोध आघाडीला' (Resistance Front) एक संघ मानतो."

त्यांनी आपल्या वडिलांच्या हत्येला शत्रूचे 'सर्वात मोठे गुन्हे' असे संबोधले. ते पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या शहीद नेत्यांच्या आणि सैनिकांच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्यांनी आमच्या देशावर हल्ले केले, त्या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही आणि प्रत्येक हानीची भरपाई वसूल करू."

होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत नवा इशारा

जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही खामेनी यांनी मोठी घोषणा केली आहे. "आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनाला एका नव्या टप्प्यावर घेऊन जाणार आहोत," असे त्यांनी नमूद केले. शस्त्रसंधीच्या काळात या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू होणार असली, तरी तिथे इराणच्या सशस्त्र दलांशी समन्वय राखणे अनिवार्य असेल, असे त्यांनी संकेत दिले आहेत.

शेजारील देशांना आवाहन

मोज्तबा खामेनी यांनी आखाती देशांना (Gulf Countries) उद्देशून म्हटले की, "आमच्या दक्षिण शेजाऱ्यांनी ही वस्तुस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. त्यांनी 'सैतानांच्या' खोट्या आश्वासनांना बळी न पडता योग्य बाजू निवडली पाहिजे. आम्ही अजूनही तुमच्याकडून बंधुत्व आणि सद्भावनेची अपेक्षा करत आहोत."

पंतप्रधान मोदी आणि इराणच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेमुळे तणाव कमी होण्यास मदत झाली असतानाच, खामेनी यांच्या या 'विजयाच्या घोषणे'मुळे पश्चिम आशियातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शस्त्रसंधी आणि शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर इराणची ही कठोर भूमिका काय वळण घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.