इतका भीषण हल्ला जगाने कधीच पाहिला नाही - डोनाल्ड ट्रम्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर करण्यात आलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) या लष्करी मोहिमेला जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मोहिमांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. या मोहिमेद्वारे अमेरिकेने इराणमधील शेकडो लष्करी तळांना लक्ष्य केले असून, इराणची संपूर्ण लष्करी यंत्रणा कोलमडली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर (Truth Social) पोस्ट केलेल्या एका व्हिडीओ संदेशात म्हटले की, "गेल्या ३६ तासांत अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू केले आहे. ही जगाने पाहिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि विस्मयकारक लष्करी मोहीम आहे. आपण इराणमधील शेकडो ठिकाणांवर हल्ले केले आहेत, ज्यामध्ये रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या (IRGC) सुविधा आणि हवाई संरक्षण यंत्रणांचा समावेश आहे."

या मोहिमेतील सर्वात मोठी बातमी म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी खामेनी यांना 'दुष्ट माणूस' संबोधत त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांच्या निधनानंतर इराणमधील लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. तसेच, इराणच्या नौदलाची नऊ जहाजे आणि त्यांचे मुख्यालय अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या लष्कराला आणि पोलिसांना शस्त्रे खाली टाकून शरणागती पत्करण्याचे आवाहन केले आहे. "जे शरणागती पत्करतील त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल, अन्यथा त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागेल," असा कडक इशारा त्यांनी दिला. तसेच इराणच्या नागरिकांना 'हाच देश परत मिळवण्याचा क्षण आहे' असे सांगत त्यांनी साहसी बनण्याचे आवाहन केले.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या मोहिमेत तीन अमेरिकन सैनिक शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. यावर शोक व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, "या देशप्रेमींच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल आणि दहशतवाद्यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिला जाईल." सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत ही लष्करी कारवाई पूर्ण जोमाने सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.