कोण आहे पाकिस्तानची डोकेदुखी ठरलेली 'माजिद ब्रिगेड'

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
'माजिद ब्रिगेड
'माजिद ब्रिगेड

 

पाकिस्तानमधील दुसरे सर्वात मोठे नौसेना तळ पीएनएस सिद्दिकीवर हल्ला झाला आहे. हा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (BLA) माजिद ब्रिगेटने केल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे याच माजिद ब्रिगेडने २० मार्च रोजी पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ग्वादार बंदरावर हल्ला केला होता. यात दोन कर्मचारी आणि आठ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. माजिद ब्रिगेड पाकिस्तानची डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माजिद ब्रिगेड काय आहे हे जाणून घेऊया.

माजिद ब्रिगेड काय आहे?
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अनेक विभाजनवादी संघटना आहेत. त्यातील सर्वात धोकादायक बलुचिस्तान लिबरेशन आर्मी असल्याचं म्हटलं जातं. माजिद ब्रिगेड ही बीएलएचा एक भाग आहे. ही ब्रिगेड पाकिस्तानच्या विविध भागामध्ये आत्मघातकी हल्ले करत असते. याची स्थापना २०११ मध्ये दोन भावांच्या नावावरुन करण्यात आली होती. माजिद लैंगोव असं त्यांना म्हटलं जातं.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे प्रमुख लक्ष्य बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याचं आहे. पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बलुचिस्तान आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि कमी लोकसंख्येचा प्रांत आहे. बलुचिस्तान हा नैसर्गिक संसाधनांनी युक्त प्रदेश आहे. पण, स्थानिकांना याचा लाभ मिळत नाहीये. बलुचमधील नैसर्गिक संपत्तीचा फायदा पाकिस्तानच्या इतर प्रांतांना होतो. शिवाय बलुची लोकांचे पाकिस्तानच्या संसदेतील प्रतिनिधित्व खूप कमी आहे.

बलुची लोकांचा विद्रोह
बलुचिस्तानच्या लोकांना स्वतंत्र देश हवा आहे. भारताच्या फाळणीवेळी बलुचिस्तान हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. बलुचिस्तानमधील जनतेच्या मनाविरुद्ध हे झालं होतं. बलुची नेते आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये कायम संघर्ष राहिला आहे. याकाळात अनेक बलुची नेत्यांची हत्या झालीये, अनेकांचे अपहरण करण्यात आले आहे. बलुची लोकांनी म्हणूनच पाकिस्तान सरकारविरोधात विद्रोह पुकारला आहे.

पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानमध्ये चीनला मोकळं रान दिलं आहे. चीन या प्रांतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. ग्वादार बंदरासह अनेक प्रकल्प चीनकडून बलुचिस्तानमध्ये सुरु करण्यात आले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी याच प्रकल्पांवर हल्ला करते. ग्वादर बंदरामध्ये बलुची नागरिकांना टाळून पंजाबमधील लोकांना नोकरी दिली गेली. चीनने हजारो इंजिनिअर येथे काम करतात. पण, बलुची नागरिकांना यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे.

जुल्फिकार भुट्टो यांना विरोध
बलुचिस्तानमध्ये १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत नॅशनल अवामी पार्टीचा (एनएपी) बहुमताने विजय झाला होता. त्यावेळी केंद्रामध्ये जुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार होते. संसदेत एनएपी विरोधी पक्षात होती. एएनपी बलुचिस्तानला स्वायत्तता देण्याच्या बाजूची होती. १९७१ मधील बांगलादेशच्या विभाजनामुळे एएनपीला आशा वाटू लागली होती. पण, भुट्टो यांचा याला सक्त विरोध होता.

भुट्टो यांनी या पक्षाच्या नेत्यांना दाबण्यास सुरुवाक केली. सुरुवातीला एएनपी लोकशाही मार्गाने आंदोलन करत होती. पण, सरकारकडून दडपशाही करण्यात आल्याने बलुची आंदोलन चिघळले. संपूर्ण प्रांतात कायदा सुव्यवस्था बिघडली. १९७३ मध्ये एएनपी सरकार बरखास्त करण्यात आले. पुढील काळात लष्कराने अनेक बलुची नेत्यांनी हत्या केली. यात अनेक सैनिक आणि पोलिसांचा देखील मृत्यू झाला. अनेक बलुच तरुण, महिला यांचे अपहरण करण्यात आले. ते पुन्हा कधीही सापडले नाहीत.

माजिद ब्रदर्स
बलुचिस्तानमधील एक तरुण माजिद लैंगोव सीनियर याने पंतप्रधान भुट्टो यांच्या हत्येचा कट रचला. २ ऑगस्ट १९७४ मध्ये क्वेटामध्ये आयोजित कार्यक्रमात भुट्टो येणार होते. त्यामुळे माजिद त्यांच्यावर ग्रेनेड टाकण्यासाठी एका झाडावर चढून बसला. त्याने ग्रेनेड फेकला पण तो हातातच फुटला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. माजिद शहीद झाला होता.

बलुचींसाठी माजिद सीनियर क्रांतिकारी झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी माजिदचा छोटा भाऊ ज्युनियर माजिदचा जन्म झाला. १७ मार्च २०१० मध्ये मध्ये पाकिस्तानी सैन्याने क्वेटामध्ये ज्युनियर माजिदला एका घरात घेरले आणि त्याची निर्घुण हत्या केली. बलुचिस्तासाठी दोन्ही भावांनी आपले जीवन दिले होते. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन बलुचिस्तान स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र करण्यात आली. त्यांच्याच नावाने ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. माजिद ब्रिगेडने आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत.