अबूधाबीत गेल्या वर्षी पहिले BAPS कडून हिंदू मंदिर बांधण्यात आले. BAPS हे एक सामाजिक-आध्यात्मिक हिंदू संगठन आहे. बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारे पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्यात येतात. या संस्थेची स्थापना १९०७मध्ये शास्त्रीजी महाराज यांनी केली होती. स्वामीनारायण संस्थेचे अबूधाबीतील हे मंदिर आता जगभरातील लोकांसाठी शांती आणि सौहार्दाचे केंद्र बनले आहे. गेल्या एका वर्षात २५ लाखांहून अधिक लोकांनी या मंदिराला भेट दिल्याची माहिती आध्यात्मिक गुरू ब्रह्मविहारी स्वामी यांनी दिली. ते म्हणाले, “वेगवेगळ्या धर्म, संस्कृती आणि देशांतील लोक मंदीरात येतात, प्रार्थना करतात आणि आपल्या आयुष्यात आनंद आणि प्रेम घेऊन परततात.”
दुबईत काल झालेल्या ‘जागतिक न्याय, प्रेम आणि शांती परिषदे’ दरम्यान स्वामीजींनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, “हे मंदिर अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी भेट म्हणून दिले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. तसेच BAPS चे प्रमुख महंत स्वामी महाराज यांचे देखील या मंदिराच्या निर्मितीमागे योगदान आहे.
ब्रह्मविहारी स्वामी म्हणाले, “गेल्या वर्षात २५ लाखांहून जास्त लोक मंदिरात आले. यात फक्त हिंदूच नाही, तर वेगवेगळ्या धर्म आणि देशांचे लोक होते. या मंदिराच्या बांधकामात ७०, ००० लोकांनी हातभार लावला. हे मंदिर आता जागतिक सौहार्दाचे ठिकाण बनले आहे. लोक इथे प्रार्थना करतात आणि आपल्या आयुष्यात आनंद आणि प्रेम घेऊन परततात.”
ते पुढे म्हणाले, “हे मंदिर दाखवतं की सगळे धर्म एकत्र राहू शकतात. देश एकमेकांना मदत करू शकतात. संस्कृतीमुळे भांडणं होण्याऐवजी ती लोकांना एकत्र आणू शकते. हे मंदिर शेख मोहम्मद बिन झायेद आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदारपणामुळे बांधलं गेलं. महंत स्वामी महाराज यांनी मार्गदर्शन केलं.”
अबू धाबीतील हे पहिलं हिंदू मंदिर आहे. १४ फेब्रुवारी २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. यावेळी UAE चे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयानही उपस्थित होते.
या परिषदेत बोलताना ब्रह्मविहारी स्वामी म्हणाले, “माझ्यासाठी सौहार्द सर्वात महत्त्वाचं आहे. देश कितीही मोठा असो, समाज कितीही प्रगत असो, पण सौहार्द नसेल तर त्याला काही अर्थ नाही. मोठ्या देशात सौहार्द नसेल तर तो देश चुकीचा ठरतो. मोठ्या कंपनीत सौहार्द नसेल तर कर्मचारी सुखी नसतात. श्रीमंत कुटुंबात सौहार्द नसेल तर ते तुटलेलं असतं. एखाद्या व्यक्तीच्या मनात सौहार्द नसेल, तर ती उदास राहते.”
ते पुढे म्हणाले, “सौहार्द फक्त धर्माचं काम नाही. शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा आध्यात्मिक असो सगळ्यांनी सौहार्द वाढवण्यासाठी काम करायला हवं. दुबईतली ही परिषद खूप चांगली आहे. यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र आले आहेत. ते सौहार्द, प्रेम आणि न्याय यावर विचार करत आहेत. मला यात सहभागी होऊन खूप आनंद होत आहे.”