सोमवारी पाकिस्तानमधील पेशावर येथे निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान तीन जण ठार झाले आहेत. फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर बंदूकधारी आणि दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आत्मघातकी हल्लेखोराने मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला, तर दुसरा हल्लेखोर कंपाऊंडमध्ये घुसण्यात यशस्वी झाला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लष्कर आणि पोलिसांसह सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. मुख्यालयाच्या आत अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याचा संशय असल्याने परिस्थिती अत्यंत सावधगिरीने हाताळली जात आहे.
या दलाचे मुख्यालय लष्करी छावणीच्या जवळ आणि अत्यंत वर्दळीच्या भागात स्थित आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या संरक्षण संकुलाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून लष्कर आणि पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
हल्ल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये एफसी चौक मेन सदर भागात स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही काही व्हिडिओंमध्ये दिसत आहे. मात्र, या व्हिडिओंच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला क्वेटा येथील निमलष्करी मुख्यालयाबाहेर कार बॉम्बचा स्फोट होऊन असाच हल्ला झाला होता, ज्यात किमान दहा जण ठार झाले होते.