गाझामध्ये वार्तांकन करीत असलेल्या पत्रकारांच्या दुर्दशेची कहाणी एएफपी या वृत्तसंस्थेने समोर आणली. या पत्रकारांना खाण्याची भ्रांत असून, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तातडीने हस्तक्षेप न झाल्यास गाझामधील शेवटचे पत्रकारदेखील मरतील, असा इशारा या पत्रकारांच्या गटाने दिला आहे.
गाझाच्या युद्धास्त प्रदेशात बाहेरील पत्रकारांना प्रवेश करण्यास इस्त्राईल मनाई करीत आहे. 'एपी', 'एएफपी' आणि 'रॉयटर्स' यांसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था बातम्या प्रसारित करण्यासाठी स्थानिक पत्रकारांवर अवलंबून आहेत. मात्र, या संस्थांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षिततेची चिंता आहेच. मात्र, त्याचबरोबर त्यांना अन्नपाण्यासाठी अडचणी येत आहेत. २१ महिन्यांच्या संघर्षांत येथे अंदाजे ५९,००० लोक मृत्यू पावले आहेत. 'एएफपी'मधील पत्रकारांच्या 'सोसायटी ऑफ जर्नालिस्ट्स अॅट एएफपी' संघटनेने गाझात त्यांच्या सहकाऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. 'एएफपी'च्या व्यवस्थापनाने सांगितले की, ही भीषण परिस्थिती त्यांनाही चिंता करायला लावणारी आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून असाहाय्य होत आहोत. राहणीमानाची स्थिती बिघडत आहे. गाझातील पत्रकारांचे धैर्य आणि परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. मात्र, हे फार काळ टिकू शकत नाही, असेही व्यवस्थापनाने म्हटले आहे.