अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वाबाबत एक अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. इराणमध्ये आता नव्या नेतृत्वाची वेळ आली असून, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे, असे थेट आवाहन ट्रम्प यांनी केले आहे. इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यावर जोरदार टीका केली. अयातुल्ला खमेनी हे गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सत्तेवर आहेत. ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख 'एक आजारी माणूस' (Sick Man) असा केला. खमेनी यांनी आता निवृत्त व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांनी खमेनी यांना स्पष्ट शब्दात सुनावले. "तुम्ही तुमचा देश नीट चालवा आणि स्वतःच्याच जनतेला मारणे थांबवा," असा सल्लाही त्यांनी दिला.
इराणमध्ये सध्या महागाई, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविरोधात जनतेचा मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, इराणमधील परिस्थिती अतिशय वाईट आहे. तिथले सरकार स्वतःच्या लोकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. अयातुल्ला खमेनी यांच्या दीर्घकालीन राजवटीने देशाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. त्यामुळे आता तिथे सत्ताबदल होणे गरजेचे आहे.
ट्रम्प यांनी इराणच्या जनतेला पाठिंबा दर्शवला आहे. तेथील लोक स्वातंत्र्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी इराणच्या सर्वोच्च नेत्याने सत्तेला चिटकून राहण्याऐवजी पायउतार होऊन नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.