भारतीय ड्रायव्हरच्या मुक्ततेसाठी सौदी व्यक्तीने लोकवर्गणीतून उभारले तब्बल दोन कोटी!

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
तीन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर अवदेश सागरने मानले मदत करणाऱ्यांचे आभार
तीन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर अवदेश सागरने मानले मदत करणाऱ्यांचे आभार

 

सौदी अरेबिया या इस्लामिक देशातील कायदे इस्लामिक शरियत (न्यायशास्त्र) प्रमाणे चालतात. त्यानुसार एखाद्या निष्पाप व्यक्तीची हत्या केल्यास आरोपीला मृत्युदंड दिला जातो किंवा ब्लडमनी (दिया) दंड स्वरुपात भरून मुक्त होता येते. ब्लडमनी म्हणजे या कृत्याबद्दल मृतकाच्या कुटुंबियांना दिली जाणारी नुकसानभरपाई. मात्र हा पर्याय निवडीचा अधिकार मृतकाच्या कुटुंबियांना दिलेला असतो.
 

१३ मार्च २०२० हा दिवस मुळचा उत्तर प्रदेशचा मात्र सध्या सौदीमध्ये ड्रायव्हर असलेल्या ५८ वर्षीय अवदेश सागरच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. त्या दिवशी ते चालवत असलेला पाण्याचा टँकर अचानक समोरून येणाऱ्या कारवर आदळला. या अपघातात तीन महिलांसह चार सौदी नागरिकांचा मृत्यू झाला. तर, एकाला कायमचे अपंगत्व आले.


उत्तर प्रदेश येथील वाराणसीजवळील जानपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अवदेश सागरला मोटार विम्याचे लाभ मिळाले नाही. आणि त्यांचे स्पोन्सरही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यामुळे अपघात झाल्यापासून ते रियाध-ताईफ रोडवरील अल कुवैया गावातील तुरुंगात होते. न्यायालयाने त्यांना ९ लाख ४५ हजार लाख रियाल (जवळपास २ कोटी भारतीय रुपये) दिया आणि इतर शुल्क म्हणून देण्याचे आदेश दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ही रक्कम भरणे ८ मुलांचा बाप असलेल्या सागरला निव्वळ अशक्य होते. तुरुंगवास आणि शिक्षेची रक्कम भरणे शक्य नसल्याने आपण मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकू याची आशाच त्यांनी सोडली होती. आयुष्यभर तुरुंगवास भोगण्याची त्यांनी पूर्ण मानसिक तयारी केली होती. ते पूर्णपणे निराश झाले. मुक्तीच्या सगळ्या आशा संपल्या. कोणाकडे मदत मागावी हेच पत्नी सुशीला देवी आणि मुले यांना कळत नव्हते.

या प्रकरणाची माहिती मिळताच सौदीतील हादी हमूद कैतानी हा तरुण सागरच्या मदतीला धावून आला. कैतानीने केवळ अवदेश सागरचीच नाही तर भारतातल्या त्यांच्या गरीब कुटुंबाचीही मदत केली. 

सौदी अरेबियातील अधिकारी आर्थिक कारणास्तव तुरुंगात असलेल्या कैद्यांना सोडण्यास मदत करतात.हमूदने देणगी गोळा करण्यासाठी सौदीतील अधिकारी व राज्यपालांची परवानगी घेतली. आणि जवळजवळ १० दिवसांच्या आत अधिकृतपणे जवळपास ९ लाख ४५ हजार लाख रियाल सरकारी खात्यात जमा करण्यात आले. मदतीच्या एका आवाहनानंतर सौदीतील नागरिकांकडून हे पैसे जमा करण्यात आले.
 
एका भारतीय नागरिकाच्या त्यातही एका हिंदू व्यक्तीच्या मुक्त्तेसाठी लोकवर्गणी जमा करणाऱ्या हादी हमूद कैतानी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. तब्बल तीन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर सागरने ईश्वराचे आणि त्यांची सुटका करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आणि विशेषतः हादी हमूद कैतानी यांचे एका व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानले.