२०२६मध्ये 'एआय' ठरणार रोजगाराचे नवे टूल

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 6 h ago
२०२६मध्ये 'एआय' ठरणार रोजगाराचे नवे टूल
२०२६मध्ये 'एआय' ठरणार रोजगाराचे नवे टूल

 

राजीव नारायण

कोल्हापूर, महाराष्ट्र: चामड्याच्या एका छोट्या कार्यशाळेत आजही दशकांपासून चालत आलेल्या पद्धतीनुसार हाताने बूट कापले, शिवले आणि पॉलिश केले जातात. याच 'फॅक्टरी'मधील एक तरुण शिकाऊ मुलगा आपल्या फोनमध्ये काहीतरी शोधत आहे. तो मनोरंजनासाठी नाही, तर व्हॉट्सॲपवर बुटांचे भाव तपासण्यासाठी, स्थानिक विक्रेत्याकडून आलेल्या ऑनलाइन ऑर्डरचा मागोवा घेण्यासाठी आणि शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिनिशिंगच्या नवीन पद्धती शिकणारा एक छोटा व्हिडिओ पाहण्यासाठी फोन वापरत आहे.

बंगळुरू, कर्नाटक: या कार्यशाळेपासून काही शंभर किलोमीटर अंतरावर, एक सॉफ्टवेअर टेस्टर आपले टेबल आवरत आहे. त्याला 'एचआर' विभागाने नुकतेच सांगितले की, त्याचे काम आता एक 'एआय' टूल अधिक वेगाने आणि स्वस्त दरात करू शकते. त्याला तीन महिन्यांचा मूळ पगार दिला जाईल आणि त्याची नोकरी तिथेच संपली आहे.

भारताच्या असंघटित क्षेत्रातील हृदय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील केंद्रस्थान असलेल्या या दोन घटना आजच्या भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) विरोधाभासी चित्र स्पष्ट करतात. एआय आता केवळ सॉफ्टवेअर इंजिनिअर्स किंवा कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते आता किरणा दुकाने, छोट्या कार्यशाळा, शेतं, वाहतूक केंद्रे आणि घरगुती उद्योगांमध्येही शिरले आहे. भारतासमोरचा खरा प्रश्न हा नाही की एआय नोकऱ्या नष्ट करेल का, तर प्रश्न हा आहे की कोणाचे काम बदलेल, कोणाला याचा फायदा होईल आणि या विषम अर्थव्यवस्थेत कोण मागे पडेल?

काचेच्या इमारतींच्या पलीकडचे जग

एआय आणि नोकऱ्यांबाबतच्या बहुतेक चर्चा आयटी आणि बीपीओ क्षेत्राभोवतीच फिरत राहिल्या, आणि त्याला तशी कारणेही आहेत. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमधील कपातीने मध्यमवर्गीयांना हादरवून सोडले आहे. पण या चर्चेत ९० टक्के कामगार ज्या असंघटित क्षेत्रात काम करतात, त्या मोठ्या चित्राकडे दुर्लक्ष होत आहे. यात रस्त्यावरील विक्रेते, छोटे उत्पादक, मजूर, कारागीर आणि घरकामगार यांचा समावेश आहे. एआयच्या चकचकीत अंदाजात या लोकांचा उल्लेख क्वचितच होतो.

या लोकांसाठी एआय हे केवळ नोकरी जाण्याचे पत्र म्हणून येत नाही, तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा अचानक शेवट म्हणून येते. कोपऱ्यावरचे किरणा दुकानच घ्या. डिजिटल पेमेंट, स्टॉक व्यवस्थापनाचे ॲप्स आणि ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स यांनी या दुकानांचे स्वरूप बदलले आहे. काही दुकानदारांना एआयमुळे मागणीचा अंदाज घेऊन फायदा वाढवता येतो. पण तंत्रज्ञानाची फारशी ओळख नसलेल्या जुन्या दुकानदारांसाठी, हेच तंत्रज्ञान विस्थापित होण्याचे संकट ठरत आहे, कारण मोठे प्लॅटफॉर्म्स त्यांना स्पर्धेतून बाहेर ढकलत आहेत.

तसेच, मुरादाबादचे पितळकाम आणि तिरुपूरचे विणकाम यांसारख्या उत्पादन केंद्रांमध्ये मोठ्या कंपन्या एआय डिझाइन टूल्स आणि स्वयंचलित तपासणी पद्धती वापरत आहेत. यामुळे त्यांची निर्यात क्षमता वाढत असली, तरी ज्या छोट्या कार्यशाळा हे तंत्रज्ञान परवडू शकत नाहीत, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा धोका केवळ एका रात्रीत बेरोजगारी वाढण्याचा नसून, पिढ्यानपिढ्या समुदायांना आधार देणाऱ्या पारंपरिक उपजीविकेची साधने नष्ट होण्याचा आहे.

केवळ कोडिंगच नाही, हातांच्या श्रमाचे काय?

अकुशल आणि अर्धकुशल कामगार एआयच्या या प्रवासात एका नाजूक वळणावर आहेत. बांधकाम मजूर, गोदामातील हमाल, स्वच्छता कर्मचारी आणि शेतमजूर यांचे काम शारीरिक श्रमाचे असल्याने ते स्वयंचलितकरणापासून (Automation) सुरक्षित असल्याचे मानले जायचे. पण आता हे गृहीतक खोटे ठरत आहे. एआयवर चालणारी यंत्रे आणि स्वयंचलित वाहतूक व्यवस्था आता बांधकामे, बंदरे आणि गोदामांमध्ये प्रवेश करत आहेत. जरी पूर्णपणे यंत्रांवर अवलंबून राहणे अजून दूर असले, तरी उत्पादकता वाढवण्याच्या दबावामुळे तेच काम करण्यासाठी आता कमी कामगारांची गरज भासत आहे.

दुसरीकडे, एआय जगण्याचे नवीन मार्गही उपलब्ध करून देत आहे. डिलिव्हरी, टॅक्सी सेवा आणि घरगुती सेवा देणारे ॲप्स पूर्णपणे अल्गोरिदमवर चालतात. एखाद्या स्थलांतरित कामगारासाठी अशा ॲप्समुळे मध्यस्थाशिवाय कामाची संधी मिळते. पण त्याच वेळी हे कामगारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि अनिश्चित उत्पन्नाचे साधनही बनते, जिथे मशीन ठरवते की कोणाला काम मिळणार आणि कोणाला नाही. या जगात एआय श्रम संपवत नाही, तर ते श्रमाचे स्वरूप अधिक अनिश्चित बनवते.

कारागिरांसमोर एक वेगळाच पेच आहे. एआयमुळे तयार झालेली स्वस्त डिझाइन्स हाताने बनवलेल्या उत्पादनांच्या किमती कमी करत आहेत. मात्र, डिजिटल मार्केटप्लेस त्याच कारागिरांना जागतिक ग्राहकांशी जोडूनही देत आहेत. कच्छचा विणकर किंवा खुर्जाचा कुंभार आता स्थानिक मर्यादा ओलांडून ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. थोडक्यात, यश हे आता त्यांच्या डिजिटल कौशल्यावर आणि धोरणांवर अवलंबून आहे.

विषमतेचा खरा धोका

विकसित अर्थव्यवस्था आणि भारताच्या 'एआय' क्षणातील सर्वात मोठा फरक केवळ उत्पन्नाचा नाही, तर संरचनेतील विषमतेचा आहे. अमेरिका किंवा युरोपमध्ये स्वयंचलितकरणामुळे नोकरी गेल्यास तिथल्या सामाजिक सुरक्षा यंत्रणा आणि पुन्हा कौशल्य शिकवण्याच्या वाटा कामगारांना आधार देतात. भारतात ही चूक सुधारण्याची संधी कमी आहे. एआयमुळे विस्थापित झालेल्या कारखाना कामगाराकडे किंवा रस्त्यावरील विक्रेत्याकडे नवीन कौशल्य शिकण्यासाठी लागणारी पुंजी, वेळ किंवा संस्थात्मक पाठबळ नसते.

म्हणूनच "एआय नष्ट होणाऱ्या नोकऱ्यांपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण करेल" हा दावा भारतासाठी पोकळ ठरतो. जरी नोकऱ्यांची संख्या वाढली, तरी त्या बदलाचा खर्च सर्वांना समान पेलता येणारा नाही. ज्यांना इंग्रजी येते, ज्यांच्याकडे डिजिटल साधने आहेत आणि जे शहरांत राहतात, ते स्वतःला जुळवून घेतील. पण तळागाळातील लोक, विशेषतः असंघटित क्षेत्रातील महिला, मजूर आणि वयोवृद्ध कामगार नव्या अर्थव्यवस्थेबाहेर फेकले जाण्याची भीती मोठी आहे.

पुढील वाटचाल आणि उपाय

जर एआयला भारतासाठी पूरक बनवायचे असेल, तर धोरणे केवळ मोठ्या कंपन्यांच्या एअरकंडिशन्ड केबिन्समध्ये ठरवून चालणार नाही. केवळ इंजिनिअर्सना कोडिंग शिकवणे म्हणजे 'रीस्किलिंग' नव्हे. त्यात दुकानदारांसाठी डिजिटल साक्षरता, गिग वर्कर्सना प्लॅटफॉर्मवर मिळणारे अधिकार, छोट्या उत्पादकांसाठी तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि कारागिरांना डिझाइनमध्ये मिळणारे पाठबळ यांचा समावेश असायला हवा.

ज्या कामांची जागा एआय सहज घेऊ शकत नाही, जसे की सेवा कार्य (Care work), सामाजिक सेवा, स्थानिक ज्ञान आणि सांस्कृतिक निर्मिती, अशा मानवी श्रमाचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. या क्षेत्रांना सरकारी निधी देऊन तिथे विस्थापित कामगारांना सामावून घेता येईल. तसेच, भारतात अधिक मजबूत सामाजिक सुरक्षा जाळे हवे, जेणेकरून कामगाराला नवीन कौशल्य शिकताना उपासमारीची भीती वाटणार नाही.

एआय ही काही दयामाया नसलेली सेना नाही, तर ती आपण घेतलेल्या निर्णयांनी आकार घेणारे एक साधन आहे. हे साधन संपत्ती आणि संधी काही मोजक्या हातांत केंद्रित करेल की ती सर्वांपर्यंत पोहोचवेल, हे आपल्या निवडीवर ठरेल. बंगळुरूचा इंजिनिअर असो वा कोल्हापूरचा चांभार, कामाच्या भविष्याची व्याख्या आता पुन्हा लिहिली जात आहे. जर आपण कॉर्पोरेट नफा आणि भीतीपलीकडे जाऊन पाहिले, तर एआय हे सर्वांच्या समृद्धीचे माध्यम ठरू शकते. अन्यथा, ते विषमतेला अधिक वेगवान, स्वस्त आणि अभूतपूर्व स्तरावर घेऊन जाईल.

(लेखक पत्रकार आणि संवाद तज्ज्ञ आहेत)