ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत नाराज, अमेरिकेतूनच उठला विरोधाचा आवाज!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंध ताणले गेले असून, ते तात्काळ सुधारण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन अमेरिकेच्या १९ प्रभावशाली खासदारांनी (Lawmakers) एका पत्राद्वारे केले आहे. 'रिपब्लिकन' आणि 'डेमोक्रॅट' या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन हे पत्र लिहिल्याने, ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे.

या पत्रात खासदारांनी म्हटले आहे की, "तुमच्या काही अलीकडील कृतींमुळे आणि धोरणांमुळे भारतासोबतच्या आपल्या महत्त्वाच्या भागीदारीत तणाव निर्माण झाला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी तसेच दोन्ही देशांच्या आर्थिक समृद्धीसाठी हे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत."

खासदारांनी विशेषतः भारताकडून रशियन तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून लावण्यात आलेल्या निर्बंधांवर (Tariffs) नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या ऊर्जा गरजा आणि त्याचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक आहे. अशा निर्बंधांमुळे दोन्ही देशांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.

"भारत हा अमेरिकेचा एक नैसर्गिक आणि विश्वासार्ह भागीदार आहे. त्यामुळे आपण हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत," असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

या पत्रावर 'इंडिया कॉकस'मधील अनेक प्रमुख सदस्यांच्या सह्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे निर्बंध "अन्यायकारक" असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अमेरिकेतूनच खासदारांनी आवाज उठवल्याने, ट्रम्प प्रशासनाला आपल्या भारतविषयक धोरणांचा पुनर्विचार करावा लागू शकतो, असे मानले जात आहे.