इराणवरील अमेरिकेची नाकेबंदी अखेर उठली; हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाच्या टँकर्सची वाहतूक सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलाची जहाजे
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलाची जहाजे

 

अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ तणावाला आणि युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेने इराणवरील आपली नाकेबंदी (Blockade) गुरुवारी अधिकृतपणे उठवली असून, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) तेलवाहू जहाजांची ये-जा पुन्हा सुरू झाली आहे. महिनाभराच्या संघर्षानंतर या महत्त्वपूर्ण सागरी मार्गावरून जहाजांची वाहतूक सुरू झाल्याने जागतिक बाजारपेठेला मोठा दिलासा मिळाला आहे.

थेट चर्चेला इराणची संमती

युद्ध थांबवण्याच्या या कराराच्या अंमलबजावणीनंतर, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेसोबत थेट चर्चेला (Direct Negotiations) मंजुरी दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच खामेनेई यांनी या करारावर भाष्य करताना, भविष्यात अमेरिकेशी समोरासमोर चर्चा होणार असल्याचे संकेत दिले. "थेट चर्चा करणे म्हणजे शत्रूचे मत स्वीकारणे असा होत नाही," असे त्यांनी राज्य प्रसारमाध्यमांतून स्पष्ट केले आहे.

व्यापारी वाहतुकीला गती

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बुधवारी रात्री सुमारे १२.५ दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक झाली. युद्धकाळात तेलाचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता पुरवठा सुरळीत झाल्याने किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. लॉयड्स लिस्ट इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, सुमारे ११० दिवसांनंतर प्रमुख कंपन्यांची जहाजे या मार्गावरून पुन्हा प्रवास करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार अमेरिकन अर्थव्यवस्थेला 'आर्थिक संकटातून' वाचवण्यासाठी केल्याचे म्हटले आहे.

या करारांतर्गत ६० दिवसांत इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमावर अंतिम तोडगा काढण्याचे उद्दिष्ट आहे. जरी अमेरिकेने इराणवरील निर्बंध शिथिल केले असले तरी, युरोपियन युनियनने मात्र आपल्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील हा करार जागतिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे.