मुस्लिम पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उच्च शिक्षणातील प्रमाण अधिक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Muslim Women
Muslim Women

 

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल २०२०-२१  (All India Survey on Higher Education (AISHE))  गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. उच्च शिक्षणामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि इतर पदवी, डिप्लोमा आणि प्रमाणपत्रे यांचा समावेश होतो. त्यांच्याशी संबंधित शिक्षणसंस्थांमधील शिक्षक, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या नोंदी अशा बऱ्याच घटकांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला जातो.

 

या काळात जगावर कोरोनाचे सावट होते. त्याचा मोठा फटका शिक्षणाला बसला. त्याचे प्रतिबिंब अहवालात दिसणे स्वाभाविक होते.  २०२०-२१ या वर्षात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणामधले स्त्रियांचे प्रमाण घटले हे  सरकारी सर्वेक्षण सांगते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या प्रमाणाच्या तुलनेत कोरोना काळात कमी झालेली ही संख्या निश्चितच चिंताजनक आहे.  मात्र या अहवालातून एक सकारात्मक गोष्टही समोरआली आहे. मुस्लिम पुरुषांच्या तुलनेत मुस्लिम महिलांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक १००० मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये ५०३ महिला आहेत असे हा अहवाल सांगतो.

 

गेल्या काही अहवालातील आकडेवारी पाहता मुस्लिम महिलांचे शिक्षणातील प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे आशादायक चित्र समोर येते. उदाहरणादाखल पाहायचे झाल्यास २०१९-२० मध्ये हे प्रमाण ५०.२% एवढे होते. २०१८-१९ मध्ये ते ४९.३% तर २०१२-१३ मध्ये हे प्रमाण ४६.७% इतके होते.

 

२०१९-२० तुलनेत २०२०-२१ मध्ये उच्च शिक्षणातील नावनोंदणी ७.५ टक्क्यांनी वाढली आहे. एकूणच वेगवेगळ्या  श्रेणीत मिळून हा आकडा ४.१४ कोटींवरगेला आहे. मुस्लिम पुरुषांची नोंदणी ८.८ टक्क्यांनी घसरून ०.९५ दशलक्ष झाली. यातुलनेत मुस्लिम महिलांच्या नोंदणी प्रमाणात कमी घट झाली आहे. ते नोंदणी प्रमाण ८.३ टक्क्यांवरून घसरून ०.९७  दशलक्ष झाले आहे.

 

वॉशिंग्टन स्थित प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार पश्चिम आशिया, आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि उत्तर आफ्रिका येथील देशांमध्येमुलींच्या शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. संस्थेच्या डिसेंबर २०१६ मधील अभ्यासानुसार, ‘मुस्लिम स्त्रिया या मुस्लिम पुरुषांपेक्षा शिक्षणाचाअधिक फायदा करून घेत आहेत. परिणामी या समाजातील लिंगभेदही कमी होत आहे.’

 

उच्च शिक्षणात सर्वाधिक महिलांचा वाटा असलेले  राज्य केरळ (६०.१ टक्के) आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये लडाख मध्ये हे प्रमाण ६६.४  टक्के तर लक्षद्वीपमध्ये ७८.५ टक्के आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशही यात आघाडीवर आहे. राज्यात उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्यां मुस्लिमांमध्ये ५४  टक्के महिला आहेत. याशिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्येही उच्च शिक्षण घेण्यामध्ये प्रमाण मुस्लीम महिलांचे हे पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे AISHEच्या या अहवालातून समोर आले आहे.