कॅन्सरग्रस्त मुलीचे प्राण वाचवण्यासाठी तरुणांनी मोडला रोजा

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
उत्तराखंडमध्ये पाच मुस्लीम तरुण रक्तदानासाठी सरसावले
उत्तराखंडमध्ये पाच मुस्लीम तरुण रक्तदानासाठी सरसावले

 

कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका 14 वर्षीय मुलीचे प्राण वाचवण्यासाठी 5 मुस्लीम तरुणांनी आपला रोजा मोडल्याची प्रेरणादायी घटना उत्तराखंडमधून समोर आली आहे. कर्करोगग्रस्त मुलीला रक्त देण्यासाठी या पाचही तरुणांनी रोजा मोडत रक्तदान केले.

पाच तरुणांनी मोडला रोजा
शाहरूख मलिक, जिशान अली, आसिफ अली, सावेज अली आणि साहिल अली अशी या पाच तरुणांची नावे आहेत. डेहराडूनमधील कर्करोगग्रस्त अंकिता गोंड नावाच्या मुलीला रक्त देण्याची गरज होती. याची माहिती शाहरूखला सोशल मीडियावरून मिळाली. तिच्याशी रक्तगट जुळत असल्याने त्याने रोजा मोडून रक्तदानाचा निर्णय घेतला. मात्र अंकिताला आणखी रक्ताची गरज होती. यानंतर सारखा रक्तगट असलेल्या जिशानच्या चार मित्रांनीही रोजा मोडत अंकिताला रक्त देण्याचा निर्णय घेतला. अखेर या पाच जणांनी रोजा मोडत केलेल्या रक्तदानामुळे अंकिताला वेळेवर रक्त उपलब्ध झाले.

धार्मिक सलोख्याचा संदेश
एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी पाचही मुस्लीम तरुणांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. धार्मिक प्रथा मोडत एखाद्याचे प्राण वाचवण्यास प्राधान्य देणाऱ्या या पाचही मुस्लीम तरुणांनी त्यांच्या कृतीतून धार्मिक सलोख्याचा गरजेचा संदेशही दिला आहे.

सर्व सामान्य कुटुंबातील
कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी रक्तदान करायला आम्ही रोजा मोडल्याने देव आमचा रोजा स्वीकारेल असे शाहरूख यानंतर म्हणाला. अंकिताला रक्तदान करणारे पाचही मुस्लीम तरुण अगदी सामान्य परिवारातील आहेत. शाहरुख त्याच्या वडिलांच्या डेअरीच्या दुकानात त्यांना मदत करतो. जिशान, आसिफ व सावेज प्लंबिंगचे काम करतात, तर साहिल हा कुटुंबाच्या फर्निचरच्या व्यवसायात मदत करतो. तर अंकिताचे वडील ब्यासमुखी गोंड हे एका खासगी कंपनीत काम करतात.

वडील म्हणाले - मी ऋणी आहे
या अनोळखी लोकांनी माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असे ते म्हणाले. गोंड हे मुळचे बिहारचे असून गेल्या 10 वर्षांपासून हरिद्वारमध्ये राहतात. अंकिताने अलिकडेच 8 वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर तिला रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे रक्त बदलण्यासाठी तिला रक्ताची गरज होती.