प्रिय वाचक,
या खास प्रसंगी, 'आवाज - द व्हॉइस' परिवारातर्फे तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठी दुहेरी आनंदाचा आहे. पहिला आनंद आपल्या महान संस्कृतीच्या गौरवाचा आणि दुसरा, आमच्या बंगाली आवृत्तीच्या शुभारंभाचा.
सहा भाषांमधील आमच्या कन्टेन्टला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच तुमच्या या न्यूज प्लॅटफॉर्मने ही लक्षणीय झेप घेतली आहे. याच यशाच्या जोरावर, जानेवारी २०२१मध्ये सुरू झालेल्या आमच्या प्रवासात, 'बंगाली' या सातव्या भाषेतील वेबसाईट सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
गेल्या अवघ्या चार वर्षांत, जगभरातील वाचकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याने आम्ही भारावून गेलो आहोत. इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी, आसामी आणि अरबी भाषांमधील आमची वाचकसंख्या सातत्याने वाढत आहे. आता आम्ही दरमहा एक कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडत आहोत. हे यश केवळ तुमच्या सततच्या सहभागामुळे आणि प्रोत्साहनामुळेच शक्य झाले आहे.
वर्षभरापासून आमच्या बंगाली वाचकांकडून त्यांच्या भाषेत आवृत्ती सुरू करण्यासाठी अनेक विनंत्या येत होत्या. ही मागणी आम्ही जबाबदारीने आणि गांभीर्याने घेतली. आम्ही प्रतिभावान बंगाली संपादकीय टीमला एकत्र आणले आणि एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. आमचा हा बंगाली भाषेतील विभाग आता पूर्णपणे कार्यान्वित आहे. आजपासून, आमचे बंगाली भाषिक वाचक आमच्या वेबसाइटचा आणि ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्टचा त्यांच्या भाषेत आनंद घेऊ शकतील.
बंगाल ही रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरूल इस्लाम यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांचा कालातीत वारसा लाभलेली, समृद्ध सांस्कृतिक भूमी आहे.या प्रदेशाने अनेकदा आव्हानात्मक काळ पाहिला, मात्र त्याने नेहमीच सर्वसमावेशकता, सलोखा आणि सर्व समुदायांप्रति आदराची भावना जपली आहे. बांगलादेशातील आमच्या मित्रांसोबतच पश्चिम बंगालच्या प्रेरणादायी कथा जगासमोर मांडण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, असे आम्ही मानतो.
'सर्वसमावेशक पत्रकारिता' हे आमचे नेहमीच मार्गदर्शक तत्त्व राहिले आहे. 'आवाज - द व्हॉइस'ची प्रत्येक टीम या आदर्शाप्रती कटिबद्ध असून, आमचा कन्टेन्ट विविधता आणि अर्थपूर्ण कथाकथनाला महत्त्व देईल याची आम्ही खात्री देतो. आजच्या गजबजलेल्या डिजिटल विश्वात, आम्ही एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय माध्यम म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करत असताना, तुमचा विश्वास आणि पाठिंबा असाच कायम राहील, अशी आम्ही अपेक्षा करतो.
- आतिर खान
(लेखक ‘आवाज द व्हाॅइस’चे मुख्य संपादक आहेत.)