जफर पनाही : इराणमधील दडपशाहीच्या विरोधातील सिनेमॅटिक आवाज!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 20 d ago
 ईरानी फिल्म निर्माते जफर पनाही
ईरानी फिल्म निर्माते जफर पनाही

 

- अजित राय

प्रसिद्ध इराणी चित्रपट निर्माता जफर पनाही यांनी त्यांच्या 'इट वॉज जस्ट ॲन अॅक्सिडेंट' या चित्रपटासाठी 78व्या कान्स चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार, पाल्म द’ ओर, जिंकला. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमन आणि ज्युरी अध्यक्ष जूलिएट बिनोश यांनी कान्समधील ग्रँड थिएटर ल्युमिएर येथे झालेल्या समारोप समारंभात जफर पनाही यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पाल्म द’ ओर पुरस्कार प्रदान केला.

जूलिएट बिनोश यांनी जफर पनाही यांचे नाव जाहीर केले तेव्हा ते काही क्षण आपल्या जागेवरच थबकले. नंतर ते भावनिक होत म्हणाले, “माझ्या देशात-इराणमध्ये-माझे अनेक सहकारी चित्रपट निर्माते आणि कलाकार तुरुंगात असताना मी इथे एकटाच कसा आनंदी राहू शकतो? अनेकांना चित्रपट बनवण्यास बंदी आहे.” जफर पनाही यांना नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. 2010मध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती आणि 20 वर्षांसाठी चित्रपट बनवण्यास बंदी घालण्यात आली होती.

जफर पनाही यांच्यावर अनेक वर्षे तेहरानमध्ये नजरकैदेत होते. पाल्म द’ ओर पुरस्कारासाठी त्यांचे नाव पुकारले गेल्यावर ग्रँड थिएटर ल्युमिएरमधील 3500 प्रेक्षकांनी उभे राहून उत्साहाने टाळ्या वाजवत त्यांचा गौरव केला. यावेळी ज्युरी अध्यक्ष जूलिएट बिनोश म्हणाल्या, "जफर पनाही आपल्या देशात (इराण) हुकूमशाही आणि धार्मिक मूलतत्त्ववादाविरुद्ध मानवी सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहेत."

'इट वॉज जस्ट ॲन अॅक्सिडेंट'हा चित्रपट तेहरानमधील एका रात्रीच्या कार अपघातानंतरच्या रंजक परिस्थितींवर आधारित आहे. सूडापासून सुरु होणारा हा प्रवास क्षमा आणि करुणेपर्यंत जातो आणि खुनाच्या नैतिकतेवर चर्चा घडवतो.

पत्रकार परिषदेत भावना व्यक्त करताना जफर पनाही यांनी  सांगितले, “या पुरस्काराने मी खूप आनंदी आहे, पण काही काळ मी माझ्या सहकारी चित्रपट निर्मात्यांच्या आठवणीत हरवलो होतो. एकामागून एक त्यांचे चेहरे माझ्यासमोर येत होते. त्यापैकी काही माझ्यासोबत तुरुंगात होते आणि काही अजूनही तुरुंगात आहेत. हा पुरस्कार मी स्वातंत्र्यासाठी आपले जीव धोक्यात घालून लढणाऱ्या इराणी जनतेला समर्पित करतो.”

इराणी चित्रपटांविषयी  ते म्हणाले, "एक काळ असा होता जेव्हा इराणी सिनेमाबद्दल कोणाला माहिती नव्हते. आज त्याची एक खास ओळख आहे. अनेक इराणी चित्रपट निर्मात्यांनी यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे पोहोचलो आहोत. आम्ही आमचे आयुष्य चित्रपटासाठी समर्पित करतो. पैशाची नेहमीच अडचण असते. मात्र आम्ही सर्वांकडून पैसे घेऊ शकत नाही. गुंतवणूकदाराला चांगल्या सिनेमाचे आकलन नसेल तर तो चित्रपट खराब करतो."

उज्ज्वल भविष्याविषयी पनाही  म्हणाले, "सध्या प्रत्येक देश हिंसा, युद्ध आणि हुकूमशाहीने पोखरून निघाला आहे. आम्हाला आशा आहे की सिनेमाच्या माध्यमातून एक दिवस सर्व काही ठीक होईल. शांतता नांदेल. सर्वांना न्याय मिळेल." त्यांनी ग्रँड थिएटर ल्युमिएरच्या मंचावर आणि पत्रकार परिषदेत पर्शियन भाषेत संवाद साधला. ज्याचा प्रथम फ्रेंच आणि नंतर फ्रेंचमधून इंग्रजीत अनुवाद करण्यात येत होता.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचा (2022) जफर पनाही यांचा हा पहिला चित्रपट आहे. पण हा चित्रपट त्यांनी इराण सरकारच्या परवानगीशिवाय बनवल्याचे बोलले जातेय. त्यात महिलांना हिजाबशिवाय दाखवले आहे. ही सरकारी हिजाब कायद्याविरुद्धची सिनेमॅटिक प्रतिकार आहे. अलीकडेच इराणमध्ये सक्तीच्या हिजाबविरुद्ध मोठी चळवळ सुरू झाली आहे.

कान्स चित्रपट महोत्सवात पाल्म द’ ओर जिंकून जफर पनाही जगातील सर्व मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारे चौथे चित्रपट निर्माते ठरले आहेत. त्यांना 2015 मध्ये 'टॅक्सी'चित्रपटासाठी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर आणि 2000 मध्ये 'द सर्कल'साठी व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन लायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कान्स चित्रपट महोत्सवातील ‘ग्रँड प्रिक्स’ हा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार डेन्मार्कच्या जोआकिम ट्रायर यांना त्यांच्या सेंटिमेंटल व्हॅल्यू चित्रपटासाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ब्राझीलच्या क्लेबर मेंडोन्सा फिल्हो यांना 'द सिक्रेट एजंट' चित्रपटासाठी देण्यात आला. वॅगनर मौरा यांना याच चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ज्युरीच्या पत्रकार परिषदेत एका चित्रपटाला दोन पुरस्कार का देण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित झाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार फ्रान्सच्या हाफ्सिया हर्झी यांच्या 'द लिटल सिस्टर' चित्रपटातील अभिनयासाठी नादिया मेलिती यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार बेल्जियमचे लेखक-दिग्दर्शक जीन-पियरे डार्डेन आणि ल्यूक डार्डेन (डार्डेन बंधू) यांना 'यंग मॉम्स' चित्रपटासाठी देण्यात आला. आतापर्यंत त्यांना कान्स चित्रपट महोत्सवात नऊ वेळा पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी ज्युरी पुरस्कार फ्रान्सच्या ऑलिव्हर लेग यांच्या स्पॅनिश चित्रपट 'सेराट' आणि जर्मनीच्या माशा शिलिन्स्की यांच्या 'साऊंड ऑफ फॉलिंग' यांना संयुक्तपणे देण्यात आला.

ज्युरीने चीनच्या बी गॅन यांच्या सायन्स फिक्शन चित्रपट 'रिसरेक्शन'ला विशेष पुरस्कार दिला. ज्युरी अध्यक्ष जूलिएट बिनोश म्हणाल्या, हा निर्णय एकमताने घेण्यात आला कारण हा एक अप्रतिम चित्रपट आहे. हे असे काव्य आहे जे तुम्हाला स्वप्न पाहण्याचे निमंत्रण देते. लघुपटासाठीचा पाल्म द’ ओर पुरस्कार इराकच्या तौफिक बरहोम यांना त्यांच्या 'आय अॅम ग्लॅड यू आर डेड नाऊ'साठी देण्यात आला.कान्स चित्रपट महोत्सवाच्या इतिहासातील इराकी चित्रपट निर्मात्याला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे.

बांगलादेशच्या अदनान अल रजिव यांना त्यांच्या 'अली' चित्रपटासाठी ज्युरीचा विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला.कान्स चित्रपट महोत्सवात बांगलादेशी चित्रपट निर्मात्याला मिळालेला हादेखील पहिला पुरस्कार आहे. पहिल्या चित्रपटा साठी देण्यात येणारा कॅमेरा द’ ओर पुरस्कार हसन हादी यांना 'द प्रेसिडेंट्स केक'साठी देण्यात आला. कान्स चित्रपट महोत्सवाच्या डिरेक्टर्स फोर्टनाइट विभागात हा चित्रपट दाखवण्यात आला होता. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter