देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा होत असताना, राजधानी दिल्लीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्गा परिसरातील एका इमारतीचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
ही घटना शुक्रवारी (१५ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास घडली. स्वातंत्र्य दिन आणि शुक्रवार यामुळे दर्ग्यात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. अचानक छताचा भाग कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
या दुर्घटनेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, दर्ग्याच्या मुख्य इमारतीचे छत सुरक्षित असून, कोसळलेली इमारत ही दर्गा परिसरात असलेली एक खाजगी मालमत्ता आहे आणि ती एएसआयच्या अखत्यारित येत नाही.
प्राथमिक अंदाजानुसार, मुसळधार पाऊस आणि इमारतीचे बांधकाम जुने असल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.