'लेडी सिंघम' डॉ. सेहरिशच्या नेतृत्वात दिसले बदलत्या काश्मीरचे आश्वासक चित्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 18 h ago
महिला पोलिस अधिकारी डॉ. सेहरिश
महिला पोलिस अधिकारी डॉ. सेहरिश

 

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्यानंतर खोऱ्यातील चित्र स्पष्टपणे बदललेले दिसते. पूर्वी दहशतवाद आणि अशांतीची सावली प्रत्येक बातमीवर पसरलेली असायची. आता इथे विकास, शिक्षण, पर्यटन आणि महिलांच्या सहभागाच्या कथा ऐकायला मिळतात. एक काळ असा होता की जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सारखे भाग फक्त दहशतवादी घटनांसाठी चर्चेत असायचे. पण आता तीच भूमी नवीन इतिहास लिहित आहे.

७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुलवामा या भूमीवर संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा नजरा दिसला. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच खोऱ्यात एका महिला पोलिस अधिकाऱ्याने म्हणजे डॉ. सेहरिश यांनी स्वातंत्र्यदिन परेडचे नेतृत्व केले. ही कृती फक्त औपचारिकता नव्हती तर, बदलत्या काश्मीरचे हे खरे चित्र होते. विशेषतः काही काळापूर्वी याच पुलवामा भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला करून २६ जीव हिरावले होते. अशा परिस्थितीत महिला पोलिस अधिकाऱ्याने मार्च पास्टचे नेतृत्व करणे धैर्य आणि सशक्तीकरणाचे प्रतीक ठरले.
 

सोशल मीडियावर डॉ. सेहरिश यांचे छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. लोक त्यांना सलाम करत आहेत. लोक म्हणत आहेत की हे नवे काश्मीर आहे. इथे महिला फक्त घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत. त्या सुरक्षा दल, प्रशासन आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करताना दिसत आहेत. हे क्षण फक्त महिलांच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतीक नाही तर, खोऱ्यातील बदलाचे चित्र आहे. पुलवामामधील हा नजारा जगाला सांगतो की जम्मू-काश्मीर आता फक्त संघर्षाचा प्रदेश राहिला नाही तर, प्रगती आणि समानतेचेही प्रतीक झाला आहे. 

या निमित्ताने पुलवामा जिल्हा न्यायालय परिसरातही स्वातंत्र्यदिन समारोह पूर्ण सन्मान आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण (प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश) पुलवामा यांचे अध्यक्ष मलिक शब्बीर अहमद यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला. यावेळी न्यायिक अधिकारी, लोक अभियोजन अधिकारी, बारचे सदस्य, न्यायपालिकेचे कर्मचारी आणि पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील विविध तहसीलमध्ये विधिक सेवा समित्यांच्या अध्यक्षांनी तिरंगा फडकावून स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

हा नजारा खोऱ्यात लोकशाही आणि न्यायपालिकेच्या मजबूत मुळांची साक्ष देतो. मुख्य समारोह पुलवामा जिल्हा पोलिस लाइन्स (डीपीएल) येथे झाला. इथे जिल्हा विकास परिषद (डीडीसी) चे अध्यक्ष सैयद अब्दुल बारी अंद्राबी यांनी तिरंगा फडकावला आणि परेडची सलामी घेतली. व्यासपीठावर राजपोरा येथील आमदार गुलाम मोहिउद्दीन मीर, पुलवामा येथील उपायुक्त डॉ. बशारत कयूम, एसएसपी पुलवामा पी.डी. नित्या यांच्यासह सेना, वायुसेना, अर्धसैनिक दले आणि नागरी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

कार्यक्रमात वरिष्ठ नागरिक, शहीदांचे कुटुंबीय, समाजसेवक, विद्यार्थी, युवक आणि मोठ्या संख्येने सामान्य लोक सहभागी झाले. मार्च पास्टमध्ये जम्मू-काश्मीर पोलिस, जम्मू-काश्मीर आर्म्ड पोलिस, सीआरपीएफ, आयआरपी बटालियन, होमगार्ड, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, एनसीसी आणि विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. हा नजारा काश्मीरच्या बदलत्या वास्तवाचा जिवंत पुरावा होता.

आपल्या भाषणात डीडीसी अध्यक्ष अंद्राबी यांनी जिल्ह्यातील विकासात्मक यशांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की पुलवामा इथल्या जनतेच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि सरकारच्या धोरणांचे फळ आहे. ते म्हणाले की, प्रशासन समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. अंद्राबी यांनी पुलवामा येथील काही उल्लेखनीय यशांचा उल्लेख केला. 

उदाहरणार्थ ब्लॉक इचेगोज़ा याने नीती आयोगाच्या चौथ्या तिमाहीच्या डेल्टा रँकिंगमध्ये संपूर्ण देशातील ५०० आकांक्षी ब्लॉकमध्ये दुसरे स्थान मिळवले. हे यश सांगते की इथले लोक विकास आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर किती वेगाने पुढे जात आहेत. याचप्रमाणे पुलवामा येथे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टीला साकार करण्याच्या प्रयत्नांसाठी राष्ट्रीय पातळीवर 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट' (ओडीओपी) पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.

एवढेच नव्हे तर परख अहवालानुसार पुलवामा याने जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात प्रथम स्थान मिळवले. हे यश फक्त सांख्यिकीय आकडे नाहीत. आता दरीतील लोक शांती आणि विकासाच्या मार्गावर चालण्यास तयार आहेत हे त्याचे प्रमाण आहेत.खरे तर पुलवामा हे चित्र संपूर्ण जम्मू-काश्मीरच्या बदलत्या वास्तवाचे दर्शन घडवते. अनुच्छेद ३७० काढून टाकल्यानंतर इथे फक्त गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत. समाजाच्या प्रत्येक वर्गाला समान संधी मिळत आहेत. महिलांची भूमिका आता पूर्वीपेक्षा किती तरी अधिक सक्रिय आणि निर्णायक झाली आहे.

 
डॉ. सेहरिश यांनी परेडचे नेतृत्व करणे फक्त औपचारिक पाऊल नव्हते. तर खोऱ्यातील मुली आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत हा संदेश त्याचे प्रतीक आहे. मग ते पोलिस दल असो, प्रशासन असो, शिक्षण असो किंवा उद्यमिता असो. महिला खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत.या स्वातंत्र्यदिनी पुलवामा येथे देशाला जे चित्र दाखवले त्याने सिद्ध केले की बदल फक्त कागदांवर नाहीत. ते जमिनीवर होत आहेत. पूर्वी गोळ्यांचा आवाज ऐकू यायचा. आता तिरंग्याचा मान आणि परेडच्या कदमतालाचा आवाज गूंजत आहे.

हा नजारा फक्त जम्मू-काश्मीरसाठी नाही तर, संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच सार्थक होतो जेव्हा समाजाचा प्रत्येक वर्ग समानतेने पुढे जातो हेही हे स्मरण करून देते.आज पुलवामा येथील मुली आणि मुले तिरंग्याखाली उभे राहून संकल्प घेत आहेत. ते दहशतवादाच्या सावलीतून बाहेर पडून शांती, प्रगती आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालतील. हेच नवे काश्मीर आहे. इथे आशा आहे, उत्साह आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास आहे.