UPSC Civil Services Results 2024: 26 मुस्लीम विद्यार्थ्यांनी मारली बाजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 d ago
UPSC यशवंत :  इरम चौधरी, मोहम्मद मुनीब भट , मोहम्मद हारिस मीर आणि फरखंदा कुरेशी.
UPSC यशवंत : इरम चौधरी, मोहम्मद मुनीब भट , मोहम्मद हारिस मीर आणि फरखंदा कुरेशी.

 

टीम आवाज मराठी 

नुकताच UPSC Civil Services 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 1,009 उमेदवारांची नियुक्ती सिव्हिल सेवांसाठी शिफारस करण्यात आली. यात 335 सामान्य प्रवर्गातील, 109 आर्थिकदृष्ट्या मागास (EWS), 160 अनुसूचित जाती (SC) आणि 87 अनुसूचित जमाती (ST) मधील आहेत. विशेष म्हणजे या प्रतिष्ठित परीक्षेत 26 मुस्लिम उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यापैकी इरम चौधरी (रँक 40) आणि फरखंदा कुरेशी (रँक 67) या दोन मुस्लीम तरुणींनी टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आहे. 

परीक्षेची पार्श्वभूमी
UPSC Civil Services परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. देशात IAS, IPS, IFS आणि IRS अधिकारी याच परीक्षेतून निवडले जातात. या परीक्षेचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. 
 
2024 मध्ये सुमारे 10 लाख उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली होती. त्यापैकी 14,627 जणांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर 2,845 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले गेले. 7 जानेवारी ते 17 एप्रिल 2025 दरम्यान मुलाखती पार पडल्या. उमेदवारांचे तीनही टप्प्यातील कामगिरीचे मुल्यमामापन करून 1,009 उमेदवार निवडले गेले. 

मुस्लिम उमेदवारांचा सहभाग
या परीक्षेत 97 मुस्लिम उमेदवारांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले गेले. यापैकी 26जणांनी अंतिम यादीत स्थान मिळवले आहे. 
 
2023 मध्ये अंतिम यादीत 51 मुस्लिम उमेदवार होते. 2022 मध्ये 30, तर 2021 मध्ये फक्त 21 उमेदवारांनी यश मिळवले. 2016 आणि 2017 मध्ये अनुक्रमे 52 आणि 50 मुस्लिम उमेदवारांनी UPSCमध्ये यश मिळवले होते. 
 
अदिबा अहमद बनणार महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम IAS ? 
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची अदिबा अनम अश्फाक अहमद ने संपूर्ण भारतातून 142वा रँक मिळवला आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससीच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली होती मात्र अंतिम यादीत तिची निवड झाली नव्हती. पण तिने जिद्द सोडली नाही आणि यावर्षी अंतिम यादीत स्थान पटकावले. अंतिम यादीत वरचे स्थान मिळवल्यामुळे आदिबाला IAS रॅंक मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर ती महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनेल. 
 

 
आदिबाने पदवीचे शिक्षण (बीए उर्दु आणि बीए गणित) पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयातून पुर्ण केले आहे. तिने हज हाऊसची IAS प्रशिक्षण संस्थेतून आणि पुढे जामीया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या निवासी प्रशिक्षण संस्थेतून UPSCची तयारी केली.

UPSC CSE 2024तील यशस्वी मुस्लिम उमेदवार
UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर यशस्वी उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या यादीत धर्मानुसार विभागणी नाही. त्यामुळे केवळ नावांच्या आधारे ‘आवाज मराठी’ने ही यादी तयार केली आहे, याची नोंद घ्यावी. UPSC 2024 मधील मुस्लीम यशवंत - 

इरम चौधरी (रँक 40) 
फरखंदा कुरेशी (रँक 67) 
मोहम्मद मुनीब भट (रँक 131) 
अदीबा अनम अशफाक अहमद (रँक 142) 
वासिम उर रहमान (रँक 281) 
मोहम्मद नयाब अंजुम (रँक 292) 
मोहम्मद हारिस मीर (रँक 314) 
मोहम्मद शौकत अझीम (रँक 345) 
आलिफा खान (रँक 417) 
नाजमा ए सलाम (रँक 442) 
शकील अहमद (रँक 506) 
शाह मोहम्मद इम्रान मोहम्मद इरफान (रँक 553) 
मोहम्मद अफ्ताब आलम (रँक 560) 
मोहसिना बानो (रँक 585) 
अबूसालिया खान (रँक 588) 
सैयद मोहम्मद अरिफ मोईन (रँक 594) 
गुलाम हैदर (रँक 633) 
हसन खान (रँक 643) 
घांची गजाला मोहम्मदहनिफ (रँक 660) 
नेसरिन पी फासिम (रँक 703) 
मुहम्मद सलाह टी ए (रँक 711) 
सदाफ मलिक (रँक 742) 
यासर अहमद भट्टी (रँक 768) 
जावेद मेव (रँक 815) 
पिरजादा एम उमर (रँक 818) 
नाजिर अहमद बिजरान (रँक 847)

काही टॉपर्सची पार्श्वभूमी
इरम चौधरी उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांनी समाजशास्त्र हा पर्यायी विषय घेतला होता. फरखंदा कुरेशी जम्मू-काश्मीरमधील असून त्यांनी भूगोल निवडला. काश्मीरच्या मोहम्मद मुनीब भट यांनी इतिहास विषय घेऊन यश मिळवले. अदीबा अनम अशफाक अहमद बिहारमधील आहेत आणि त्यांनी मानवशास्त्र विषय घेतला होता. 

यामुळे वाढतोय मुस्लीम टक्का
UPSC तील मुस्लिम उमेदवारांचा टक्का गेल्या दशकभरात वाढू लागला आहे. दिल्ली, हैदराबाद, जामिया नगर सारख्या देशभरातील कोचिंग सेंटर्सनी आणि स्वयंसेवी संस्थांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. झकात फाउंडेशनसारख्या संस्थांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिले आहे. दुसरीकडे मुस्लीम तरुणांमध्ये UPSCच्या तयारीबाबत जागरूकता वाढली. यशस्वी विद्यार्थ्यांमुळे अनेकांना प्रेरणाही मिळाली आहे. 

मुस्लीम विद्यार्थ्यांची दशकभरातील कामगिरी 
गेल्या दशकभरतील मुस्लिम उमेदवारांची कामगिरीत चढ-उतार जाणवतो. 2016 मध्ये 52 आणि 2017 मध्ये 50 उमेदवार UPSC मध्ये यशस्वी झाले होते. 2023 मध्ये 51 उमेदवारांनी यश मिळवले. 2022 मध्ये 30, तर 2021 मध्ये फक्त 21 उमेदवार यशस्वी झाले. 2020 मध्ये 31, 2019 मध्ये 42, 2018 मध्ये 27, 2015 मध्ये 34 आणि 2014 मध्ये 38 मुस्लिम उमेदवारांनी यश मिळवले. 

यशातून समाजात सकारात्मक संदेश
मुस्लीम विद्यार्थ्यांच्या या यशाने समाजात सकारात्मक संदेश तर जाईलच पण तरुणांना प्रेरणाही मिळेल. या यादीत Top 100 मध्ये दोन मुस्लीम तरुणींनी जागा मिळवली आहे. मुस्लीम मुलींसाठी हे यश खूपच प्रेरणादायी ठरणार आहे.

पुढील वाटचाल
यशस्वी उमेदवारांना आता IAS, IPS, IFS आणि IRSसारख्या सेवांमध्ये नियुक्ती मिळेल. त्यांचे प्रशिक्षण मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत होईल. त्यानंतर हे सर्व जण देशसेवेसाठी रुजू होतील. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter