श्रीलता एम
एका लहान मुलाला स्वतःच्याच मस्तीत नाचताना पाहून पालकांना आश्चर्य वाटलं आणि थोडी काळजीही वाटली. जसा तो मुलगा मोठा झाला, तसं त्याचं नृत्यावरचं प्रेमही वाढत गेलं. सेलममधील एका अतिशय सनातनी, उर्दू भाषिक मुस्लिम कुटुंबात वाढणाऱ्या झाकीर हुसेन यांच्यासाठी ही गोष्ट सोपी नव्हती. आज ५५ वर्षांचे झाकीर हुसेन हे भरतनाट्यममधील एक नामांकित नाव असून तामिळनाडूच्या कला आणि संस्कृती विभागाचे मानद संचालक म्हणून काम पाहत आहेत.
आपल्या बालपणाबद्दल बोलताना हुसेन सांगतात की, त्यांचे कुटुंब तेलंगणातून तामिळनाडूमध्ये स्थायिक झाले होते. घरात उर्दू आणि बाहेर तमिळ बोलली जायची. नृत्यावरच्या प्रेमामुळे वडील त्यांच्यावर नेहमीच नाराज असायचे. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली, पण त्यांचे मन तिथे रमले नाही. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत त्यांनी नृत्याचा कोणताही क्लास लावला नव्हता. शेवटी नृत्यालाच करिअर बनवण्याचा निर्णय घेऊन ते सेलममधील घर सोडून गुरूच्या शोधात चेन्नईला आले.
संघर्ष आणि यशाची पायरी
चेन्नईत आल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रसिद्ध नर्तिका चित्रा विश्वेश्वरन यांची भेट घेण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. दरम्यान, स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका हॉटेलमध्ये नोकरीही केली. शेवटी त्यांची भेट झाली आणि त्या त्यांना शिकवायला तयार झाल्या. झाकीर आठवण सांगतात, "चित्रा मॅडमनी मला मोफत तर शिकवलंच, पण उलट मला दरमहा २५० रुपये विद्यावेतनही द्यायच्या."
कुटुंबाच्या विरोधाबद्दल विचारले असता ते म्हणतात, "मी एकटाच राहायचो, त्यामुळे घरच्यांच्या विरोधाची मी कधी पर्वा केली नाही. मी लग्नही केले नाही. तारुण्यातील बराच काळ मी परदेशात घालवला." सुमारे १४ वर्षे ते कॅनडा, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये राहिले, तिथे भारतीयांसाठी नृत्याचे वर्ग घेतले आणि नाव कमावले. एक मुस्लिम पुरुष असूनही शास्त्रीय नृत्य करताना त्यांना सुरुवातीला कधीच अडचण आली नाही, पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली.
शास्त्रीय कलेची खालावलेली अवस्था
झाकीर हुसेन यांनी आता नृत्य सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 'डीएमके' (DMK) पक्षात प्रवेश केला आहे. कलेचे क्षेत्र आणि देशातील सामाजिक-राजकीय वातावरण बिघडत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
शास्त्रीय नृत्याबद्दल ते खेदाने म्हणतात, "८० आणि ९० च्या दशकात नृत्याचे खूप कार्यक्रम व्हायचे आणि पैसाही मिळायचा. आता मात्र पैसा उरलेला नाही. लोकांना कार्यक्रमाला बोलावण्यासाठी विनवण्या कराव्या लागतात. कोरोनानंतर तर परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. आता कार्यक्रमाला जेमतेम २०-२५ लोक येतात. पूर्वी ८००-९०० लोकांची गर्दी असायची. आजची तरुण पिढी जुन्या संस्कृतीपासून तुटलेली आहे आणि प्रत्येक जण फक्त पैसे कमावण्याच्या मागे लागला आहे." शास्त्रीय नृत्य समाजासाठी आता अप्रासंगिक होत चालल्याचे त्यांचे मत आहे.
मंदिरातील देणगी आणि नावाचा वाद
झाकीर हुसेन हे कृष्णभक्त 'आंदाल' यांच्या कथेवर आधारित नृत्य रचनांसाठी ओळखले जातात. ते श्रीरंगम येथील रंगनाथस्वामी मंदिराला वेळोवेळी देणगी देत असतात. मात्र, अलीकडेच काही गटांनी त्यांना मंदिरात देणगी देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. "माझे नाव हीच आता एक समस्या बनली आहे. देवाने मला हे नाव दिले, ते मी निवडलेले नाही," असे ते हताशपणे म्हणतात.
२०१४ पर्यंत त्यांना भारतात कुठेही कार्यक्रम करताना अडचण आली नाही. पण आता त्यांच्या कलेपेक्षा त्यांच्या नावावर जास्त चर्चा होते. ते म्हणतात, "जर मुस्लिमांनी त्रास दिला तर त्यांना दोष दिला जातो. पण जर एखादा मुस्लिम शांततेने जगू पाहत असेल, तर त्यालाही स्वीकारले जात नाही."
राजकारणातील नवी आशा
इतरत्र जो स्वीकार मिळाला नाही, तो 'डीएमके'मध्ये मिळाल्याचे ते सांगतात. "डीएमके सर्वांना समान सन्मान देते. तिथे कोणीही असे म्हणत नाही की मुस्लिम माणूस मंदिरात काही अर्पण करू शकत नाही. कालच मी रंगनाथस्वामी मंदिरात जाऊन आलो, आता मला कोणीही रोखू शकत नाही," असे ते अभिमानाने सांगतात.
झाकीर हुसेन सध्या कला आणि संस्कृती विभागाचे मानद संचालक म्हणून राज्यातील नृत्य आणि संगीत शाळांचे काम पाहतात. भविष्याबद्दल विचारले असता ते म्हणतात, "मी नियोजनावर विश्वास ठेवत नाही. प्रवाहासोबत जाणे मला आवडते. कोणावरही कला लादता येत नाही, पण प्रत्येक कलाकाराला शिकण्याची आणि आपली कला सादर करण्याची संधी मिळायला हवी, हीच माझी इच्छा आहे."
२०१४ नंतर देश 'वसुधैव कुटुंबकम' या भावनेकडून संकुचित विचारसरणीकडे जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 'डीएमके'च्या छत्राखाली त्यांना आता सुरक्षित वाटते, जिथे सामाजिक न्यायाचा विचार केला जातो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -