डॉ. मुस्तफा बारभुईया : आसामी तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
 डॉ. मुस्तफा बारभुईया
डॉ. मुस्तफा बारभुईया

 

 दौलत रहमान/गुवाहाटी

अमेरिकेतील पॅथॉलॉजी क्षेत्रातील शीर्ष १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ. मुस्तफा बारभुईया. आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यातील असणाऱ्या मुस्तफा यांचे नाव ऐकलं तरी ईशान्य भारतातील हजारो तरुणांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने चमकतात. ‘द पॅथॉलॉजिस्ट पॉवर लिस्ट २०२४ ’ मध्ये स्थान मिळवणाऱ्या डॉ. मुस्तफा यांनी नाविन्य, नेतृत्व आणि यशाची नवी व्याख्या लिहिली आहे. बोलायला जरी हे सोप्पं वाटलं असलं तरी त्यांचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. 
 
हैलाकांडीच्या बाहादूरपूर या छोट्या गावातून डॉ. मुस्तफा यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. त्यावेळी म्हणजे १९९० च्या दशकात त्यांच्या गावात वीज तर नव्हतीच शिवाय रस्तेही नीट नव्हते. तरीही, ते सायकलवरून हैलाकांडी शहरात गणित आणि विज्ञानाच्या एक्स्ट्रा क्लाससाठी जायचे. अशा परिस्थितीत त्यांनी सानुहार अली मेमोरियल हायस्कूलमधून दहावी पूर्ण केली. त्यानंतर सिलचरच्या गुरुचरण कॉलेजमधून बारावी आणि प्राणीशास्त्रात बीएस्सी केले. याशिवाय वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि इतर विषयांचाही अभ्यास केला.

पुढील शिक्षणासाठी त्यांनी ग्वाल्हिअरच्या जिवाजी विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. या शिक्षणाने त्यांना क्लिनिकल बायोकेमिस्ट आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट बनण्याचा मार्ग मोकळा केला. आज सानुहार अली मेमोरियल हायस्कूल आणि गुरुचरण कॉलेजमधील विद्यार्थी डॉ. मुस्तफा यांचा आदर्श घेतात. “डॉ. मुस्तफा यांनी आमच्या शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकून जग जिंकले. आम्हालाही समाजासाठी मोठे काहीतरी करायचे आहे,” असे या शाळेतील एका शिक्षकाने सांगितले. डॉ. मुस्तफा यांनी आपल्या शाळा-कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे आश्वासन दिले आहे.

२०१३ मध्ये पीएचडी पूर्ण केल्यानंतर डॉ. मुस्तफा अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये पोस्ट-डॉक्टरल प्रशिक्षणासाठी गेले. भारतात येऊन आसाममध्ये क्लिनिकल बायोकेमिस्ट्री आणि मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्सवर आधारित प्रयोगशाळा सुरू करण्याचे त्यांचे ध्येय होते. पण, जॉन्स हॉपकिन्समधील प्रशिक्षणानंतर भारतात योग्य संधी न मिळाल्याने त्यांनी अमेरिकेतच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिन, हर्शे, पेनसिल्व्हेनिया येथे क्लिनिकल केमिस्ट्री फेलोशिप पूर्ण केली. आज ते क्लिनिकल बायोकेमिस्ट आणि क्लिनिकल लॅबोरेटरी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

सध्या डॉ. मुस्तफा अमेरिकेतील वेस्टर्न मॅसाच्युसेट्समधील बेस्टेट हेल्थ पॅथॉलॉजी सर्व्हिसेसचे सेक्शन मेडिकल डायरेक्टर आहेत. ते क्लिनिकल केमिस्ट्री आणि पॉइंट ऑफ केअर टेस्टिंगच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. डॉक्टरांना आणि आरोग्यसेवकांना प्रयोगशाळेतील चाचण्यांचे अर्थ समजावून सांगण्याचे काम ते करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळा अमेरिकेच्या स्थानिक आणि फेडरल नियमांचे पालन करते, ज्यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक निदान मिळते. याशिवाय, ते यूमास चॅन मेडिकल स्कूल-बेस्टेट रिजनल कॅम्पसमध्ये पॅथॉलॉजी आणि हेल्थकेअर डिलिव्हरी अँड पॉप्युलेशन सायन्सेसचे असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही कार्यरत आहेत.

डॉ. मुस्तफा यांनी अमेरिका आणि भारतात ‘फाउंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ एसेन्शियल डायग्नोस्टिक्स’ ही जागतिक ना-नफा संस्था स्थापन केली आहे. ते म्हणतात, “माझे पुढील ध्येय आहे ही संस्था कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांपर्यंत नेणे आणि अमेरिकेतील उपेक्षित भागात सेवा देणे आहे." संशोधनातही ते सक्रिय आहेत. यकृत आणि पित्ताशयाच्या कर्करोगाच्या यंत्रणांचा अभ्यास आणि निदान-उपचारासाठी बायोमार्कर शोधणे हे त्यांचे प्रमुख संशोधन क्षेत्र आहे.

डॉ. मुस्तफा यांचे अंतिम ध्येय भारतात, विशेषतः आपल्या जन्मगावी परत येऊन गरीब आणि गरजूंना सेवा देणे आहे. याविषयी ते म्हणतात, “माझ्या यशाने भारतातील तरुणांना प्रेरणा मिळत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी नेहमीच भारतातून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यास तयार आहे." मुस्तफा हा प्रवास आसामच्या तरुणांना खडतर परिस्थितीतही मेहनत आणि स्वप्नांनी यश नक्की मिळते हे शिकवतो.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter