हुसैन मन्सूरी : मानवतेचा दीपस्तंभ

Story by  Fazal Pathan | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
हुसैन मन्सूरी
हुसैन मन्सूरी

 

फझल पठाण 

‘मैं सिर्फ़ इंसानियत का फ़र्ज़ अदा कर रहा हूँ’ म्हणत मुंबईच्या रस्त्यांवर एक तरुण गोरगरिबांची सेवा करताना दिसतो. परोपकारी कार्यासाठी, विशेषतः कर्करोगग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी या तरुणाची ओळख देशभर आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणारा हा तरुण आपल्या पोस्ट्समधून लोकांना मानवतेची शिकवण देत आहे. त्याच्या प्रत्येक कृतीतून दयाळूपणा आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडते. सोशल मिडियावर लाखो व्यूज मिळवणारे हे व्हीडीओ इंस्टाग्रामपुरते मर्यादित नसून देशभरातील लोकांना प्रेरणा देणारे आहेत. हे व्यक्तिमत्व म्हणजे हुसैन मन्सुरी. 
 

अशी झाली कामाची सुरुवात
हुसैन मन्सुरी हे त्यांच्या कार्यामुळे आज देशभरात  परिचित आहेत. मात्र त्यांचा प्रवासदेखील खूप रंजक आहे. सुरुवातीच्या प्रवासाविषयी सांगताना ते अनेक वेळा भावुक होतात. ते म्हणतात, “मुंबईतील कार्डिनल ग्रेसियस हायस्कूलमधून मी शालेय शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर रिझवी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. लहानपणापासून मला फोटोग्राफी आणि कथाकथनाची आवड होती. माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच मी कामाला सुरुवात केली होती. आता मी लोकांची मदत करत असलो तरी सुरुवातीला दुसऱ्यांनी वापरलेले कपडे घालून दिवस काढले आहेत. बिकट परिस्थितीतही मी मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करत जेट एअरवेजमध्ये नोकरी मिळवली होती.”
 
घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हुसैन मन्सुरी यांनी वेटर म्हणूनही काम केले.  छोटी मोठी काम करत असतानाच हुसैन यांना समाजकार्याची ओढ लागली होती. मात्र स्वतःचीच परिस्थिती जेमतेम असल्यामुळे इच्छा असूनही गरजूंची मदत करता येण त्यांना शक्य नव्हतं. 
 

हुसैन हे गरजूंच्या मदतीसाठी कायमच तत्पर असतात. कोविडमध्ये संपूर्ण जग थांबल्यासारखं झालं होतं. अनेक निराधार लोकांवर भुकबळीची वेळ आली होती. यावेळी त्यांनी अनेकांना अन्न आणि वैद्यकीय साहित्य पुरवले होते. हुसैन विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कर्करुग्णांना आर्थिक मदत करतात. शिवाय ते असहाय्य मुलांना शिक्षणासाठी, बेघरांना अन्न आणि कपडे, आणि वृद्धांना आधार देण्यासाठीही काम करत आहे. मदत करताना ते जाती, धर्म किंवा कोणतीही पार्श्वभूमी न पाहता गरजूंची सेवा करतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मानवतेचा दूत असंही म्हटल जातं. 

आज हुसैन आपल्या छोट्या-छोट्या कृतींमधून मोठा बदल घडवत आहेत. गरजूंविषयी लोकांच्या मनात आपुलकी आणि समाजकार्याविषयी आदर निर्माण करण्यात त्यांच्या व्हिडिओंनी मोठे योगदान दिले आहे. समाजकार्याचा नवा पायंडा पाडणारे हुसैन म्हणतात, “आपल्या आजूबाजूच्या गरजू आणि उपेक्षित लोकांसाठी सामाजिक जाणीवेतून आपल्या क्षमतेनुसार काहीतरी चांगलं केलं पाहिजे. समाजाला सुंदर बनवणारी दया आणि प्रेम हीच खरी व मोठी ताकद आहे. माझ्या कामामुळे देशातील एकजण जरी प्रेरीत झाला तरी मला आनंद होईल. मला दुसरं काही नको.”   
 
माणसाकडे पैसे आले की त्याला तो जमा करावा वाटतो. कितीही पैसे असले तरी त्याला आत्मीय समाधान लाभत नाही. समाजातील अनोळखी गरजू लोकांना ते सहज मदत करत नाही. ‘तू बस दुआ कमा फिर तुझसे अमीर कोई नही’ या उक्तीवर हुसैन यांचा विश्वास आहे.  यामुळे ते सढळ हाताने गरजूंना आर्थिक मदत करतात. 
 

धार्मिक एकतेचा दिला संदेश    
अलीकडे काही समाजकंटक समाजात धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे काम जाणून बुजून करत आहेत. तर दुसरीकडे हुसैन यांच्यासारखे तरुण धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत आहे. एका व्हिडिओत ते रस्त्यावरून जात असताना हिंदू देवदेवतांचे फोटो रस्त्याच्या बाजूला विखुरल्याचे दिसत आहे. त्या फोटोची विडंबना होऊ नये म्हणून हुसैन त्या फोटोंना सन्मानपूर्वक जमा करून त्यांना पाण्यात विसर्जित करत होते.  त्यांच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली होती. द्वेषाच्या महापुरात सौहार्दाची एक कृती मोठा बदल घडवून आणते हे या व्हीडीओच्या माध्यमातून समजते. अनेक सभा, परिषदांमधून जी गोष्ट सहज शक्य होतं नाही ती सौहार्दाचा संदेश त्यांनी एका छोट्याश्या व्हिडिओतून दिला. त्या व्हीडीओवरील सर्वधर्मीयांच्या कमेंटवरुन याचा प्रत्यय येतो. 

करोडोंच्या मनात मिळवले स्थान 
हुसैन यांनी जनसेवेच्या माध्यमातून लोकांना आपलसं केलं आहे. लोक सुद्धा त्यांच्या कामाचे कौतुक करतात. हे प्रेम त्यांच्या इंस्टाग्रामवर पहायला मिळते. इंस्टाग्रामवर हुसैन यांचं एक करोड तेवीस लाख लोकांचं प्रचंड मोठं कुटुंब आहे. ते म्हणतात, “मी काम करत असताना काही फोटो काढायचो. ते फोटो आणि माझ्या काही गोष्टी मी इंस्टाग्रामवर सांगायचो. लोक त्या माध्यमातून जोडले जायचे. बरीच वर्षं काम केल्यानंतर आज माझ दुसरं कुटुंब तयार झालं आहे. मी काहीच नव्हतो तेव्हापासून या कुटुंबाने माझ्यावर आणि माझ्या कामावर प्रेम केलं. त्यांच्यामुळेचं आज मी इथपर्यंत आलो आहे. माझं काम असचं सुरू राहणार असून लोक माझ्यासोबत आहेत, याचा मला आनंद आहे.” हुसैन यांचा कंटेंट केवळ मनोरंजनापुरता नाही, तर सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण आहे.  
 
  
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका हॉटेलमध्ये त्यांनी वेटर सोबत जेवण करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ त्यांचा प्रचंड वायरल झाला होता. याविषयी ते म्हणतात, “सुरुवातीला मी देखील अनेक कामे केली आहे. मी सुद्धा वेटर म्हणून काम केलं आहे. मी त्यांच्यासोबत जेवण करून मेहनती कामगारांचा सन्मान केला आहे. यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट वाटतं नाही कारण मी त्यांच्यातलाच एक आहे.” 

दहशतवादाच्या विरोधात आणि देशाच्या समर्थनात स्पष्ट भूमिका 
एप्रिलमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याचा निषेध करताना आणि देशाच्या समर्थनात स्पष्ट भूमिका घेत हुसैन यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ते म्हणाले होते, "पहलगाम येथे हल्ला करणारे आतंकवादी माणसं नसून ते जनावर आहेत. ते कोणत्याही धर्माचे पालन करत नाहीत. इस्लाम कोणाला मारण्याची नाही तर दया, करुणा आणि प्रेमाची शिकवण देतो. इस्लाममध्ये एका माणसाचा जीव वाचवणे म्हणजे मानव जातीचे रक्षण करण्या समान आहे. या दुर्घटनेमुळे मला खूप दुख झालं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो, या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा द्यावी." 

या विषयावर करायचंय काम 
मुंबईमध्ये कॅन्सर पेशंटसाठी मोठ केंद्र आहे. याठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण येतात. त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो पैशांचा. पैशांची गरज भागवण्यासाठी ते मुंबईच्या रस्त्यांवर हतबलतेने आणि नीराशेने फाइरतान दिसतात. हुसैन देखील कॅन्सर पेशंटसाठी  काम करत असून  भविष्यातील उपक्रमाविषयी बोलताना ते म्हणतात, "दान देऊन कोणीही कधीही गरीब झालेले नाही असं अ‍ॅनी फ्रँक सांगतात. यामुळे मी थोडे थोडे पैसे जमवून गरजूंची मदत करत आहे. भविष्यात मला स्वतःची सेवाभावी संस्था सुरू करायची आहे. या संस्थेच्या माध्यमातून मी कर्करोग रुग्ण आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या स्तरावर काम करू इच्छित आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून मला सामाजिक जाणीव निर्माण करायची आहे. क्राउडफंडिंगद्वारे अधिक गरजूंना मदत करायची आहे. यासाठी मी तरुणांना सोबत घेण्याचे ठरवले आहे.”  
 

हुसैन मन्सूरी यांचं काम केवळ सोशल मीडियापुरतं मर्यादित नाही तर वंचितांविषयी सहानुभूति आणि प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या निस्वार्थी कामासाठी त्यांना स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार तर मिळालेचं शिवाय अनेक सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. हुसैन यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. साध्या कृतींनी आणि प्रामाणिकपणाने आपण जगाला अधिक सुंदर बनवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कार्याला आवाज मराठीचा सलाम.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter