मलिक असगर हाशमी
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक जमील अख्तर यांनी बिहारमधील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहिले आहे. त्यांचे हे समर्पण इतके प्रचंड आहे की, त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटते की लग्नामुळे त्यांच्या ध्येयात अडथळा येईल.
“जर मी लग्न केलं, तर ५५० मुलांचे शिक्षण आणि काळजी घेणे अवघड होईल,” असं जमील यांनी ‘आवाज-द व्हॉइस’ला सांगितले.
ते एनटीपीसीमध्ये वरिष्ठ पदावर असले तरी त्यांचे प्रयत्न पुढच्या पिढीला शिक्षणातून उभारी देण्याच्या मोठ्या उद्देशासाठी आहे. जमील हे फक्त सरकारी अधिकारी नाहीत, तर ते एक मूक क्रांतिकारी आहेत. त्यांच्या निःस्वार्थ प्रयत्नांनी शेकडो वंचित मुलांसाठी संधींची दारे उघडली आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून या कार्यात आहेत.
“लोक अनेकदा प्रसिद्धीच्या मागे धावताना आपला उद्देश विसरतात,” असं ते सांगतात. जमील यांना प्रसिद्धीपासून दूर शांतपणे काम करणं पसंत आहे. पण त्यांच्या कृतींचा परिणाम त्यांच्या समुदायात खोलवर जाणवतो. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जमील यांना 'शिक्षणामुळे आयुष्य बदलता येतं,' यावर ठाम विश्वास आहे.
ते नबिनगरच्या एनटीपीसी प्रकल्पात आपली जबाबदारी सांभाळतात आणि त्याचवेळी देहरी-ऑन-सोन येथे वंचित मुलांसाठी शाळा चालवतात. त्याच ठिकाणी त्यांनी आपले बालपण घालवले आहे. त्यांचे नोबल पब्लिक स्कूल आता अनेकांसाठी आशेचे आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनले आहे.
इथे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन कुटुंबातील मुले एकत्र शिकतात, समान संधी आणि सन्मान मिळवतात. कानपूरच्या हार्कोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले जमील २००१ मध्ये एनटीपीसीमध्ये रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती दिल्लीत झाली. पण २०१४ मध्ये नबिनगरला झालेली बदली त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. २०१५ मध्ये त्यांनी आपले जुने स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या गावात वंचित मुलांसाठी शाळा सुरू केली.
वेळ न घालवता त्यांनी शिक्षक नियुक्त केले आणि भाड्याच्या इमारतीत नर्सरीपासून सातवीपर्यंतच्या वर्ग सुरू केले. त्यांच्या शाळेत पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते, पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्यही मोफत मिळते. लवकरच अनेक मुलं शाळेत येऊ लागली. आज ५५० हून अधिक मुले इथे मोफत शिकतात.
याविषयी जमील सांगतात, “14 शिक्षकांचे पगार मी देतो. शाळेचा सर्व खर्चही मी उचलतो. हा सर्व खर्च मी स्वतःच्या खिशातून करतो."
यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण येतो का? यावर जमील हसत म्हणतात की, “मी अविवाहित आहे, माझं कुटुंब सधन आहे. मला कशाचीच कमतरता नाही.”
जमील यांचे वडील मेहबूब अख्तर उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे कनिष्ठ अभियंता होते. त्यांची आई आणि चार भाऊ त्यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा देतात. त्यांचे भाऊ देखील त्यांना या कार्यात मदत करतात, पण जमील फारसं कुणाकडून काही मागत नाहीत.
त्याऐवजी ते पुस्तकं थेट प्रकाशकांकडून घेऊन खर्च वाचवण्यासारख्या व्यावहारिक मार्गांचा अवलंब करतात. कठीण नोकरी असूनही जमील शाळेच्या प्रत्येक बाबतीत वैयक्तिकरित्या लक्ष घालतात. ते सांगतात, “आमच्याकडे पात्र शिक्षक आहेत, परंतु तरीही मी प्रत्येक मुलाच्या प्रगतीवर स्वतः लक्ष ठेवतो. कुणीही मागे राहू नये, असं मला वाटतं.”
शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित नाही, तर मुलांचे चारित्र्य घडवण्यावरही भर देते. जमील यांना शाळेत निर्माण झालेल्या सामाजिक एकतेचा खूप अभिमान आहे. याविषयी ते म्हणतात, “हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन मुलं एकत्र शिकताना पाहून मला खूप समाधान मिळतं. हेच आपल्या गंगा-जमुनी संस्कृतीचं खरं रूप आहे.”
स्थानिक लोक त्यांच्या कार्याचे कौतुक करतात. प्रभाग ३६च्या नगरसेविका गिरिजा देवी म्हणतात की, "ही शाळा गरीब मुलांसाठी वरदान आहे, जिथे मोफत दर्जेदार शिक्षण मिळतं."
शिक्षिका आरती कुमारी आणि तबस्सुम सांगतात की, "शाळा केवळ चांगलं शिक्षणच देत नाही, तर मुलांना दिशा आणि आशा देते. जमील यांना सरकारी शाळांमधील मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे. आमची शाळा अशा पालकांसाठी आशेचा किरण आहे, ज्यांना चांगलं शिक्षण हवंय पण खासगी शाळा परवडत नाहीत."
आपल्या अथक परिश्रमातून जमील अख्तर यांनी ५५० हून अधिक मुलांचं आयुष्य बदललं आहे. एका व्यक्तीच्या दृढनिश्चयाने परिवर्तन घडवता येतं, हे त्यांनी सिद्ध केलं. त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय का घेतला, असं पुन्हा विचारलं असता त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले, “जर मी लग्न केलं असतं, तर ५५० मुलांचं शिक्षण आणि त्यांचे कल्याण मी करू शकलो नसतो.”
जमील अख्तर यांचे निःस्वार्थ समर्पण आणि त्याग खरोखरच प्रेरणादायी आहे.