जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाज बदलणारे तमिळनाडूचे १० मुस्लिम 'चेंजमेकर्स'

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 d ago
जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाज बदलणारे तमिळनाडूचे १० मुस्लिम 'चेंजमेकर्स'
जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाज बदलणारे तमिळनाडूचे १० मुस्लिम 'चेंजमेकर्स'

 

तमिळनाडूतील या १० प्रभावशाली व्यक्ती समाजाचे सक्षमीकरण करताना आनंदाचा प्रकाश पसरवत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात या व्यक्तींनी केवळ स्वतःचा ठसा उमटवला नाही, तर इतरांनाही प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडून काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा दिली आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी…

१. मोहम्मद सलीम: तमिळनाडूचे 'सलीम अली'

मोहम्मद सलीम यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संरक्षणासाठी वाहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी संवर्धन जीवशास्त्र किंवा अगदी जीवशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. त्यांनी संगणक शास्त्रात पदवी घेतली आहे. मात्र, त्यांचे मन नेहमीच मुक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी तळमळत राहिले. पक्षी, साप, कुत्रे आणि इतर प्राण्यांच्या मदतीसाठी त्यांनी 'एन्व्हायर्नमेंट कन्झर्व्हेशन ग्रुप' नावाची संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ते अत्यंत प्रभावीपणे वन्यजीव संरक्षणाचे काम करत आहेत.

२. सोफिया अश्रफ: बदलाचे सूर आळवणारी रॅप स्टार

सोफिया अश्रफ या केवळ एक रॅप कलाकार नाहीत, तर त्या सामाजिक बदल आणि महिला सक्षमीकरणासाठी गाणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. चेन्नईच्या गल्ल्यांमध्ये आपल्या रॅप गाण्यांच्या माध्यमातून सोफियाने महिलांबद्दलचे जुने समज आणि शरीराशी संबंधित असलेले गैरसमज मोडीत काढले आहेत. महिलांचा सामाजिक दर्जा असो वा समाजाकडून होणारा भेदभाव, सोफिया आपले मत अत्यंत स्पष्टपणे मांडते. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या विरोधात त्यांनी बनवलेला रॅप व्हिडिओ हा सामाजिक चळवळीतील कलेचा एक उत्तम नमुना मानला जातो.

३. झाकीर हुसेन: सीमा ओलांडणारा भरतनाट्यम नर्तक

झाकीर हुसेन हे एक भरतनाट्यम नर्तक आहेत. त्यांनी लिंग आणि धर्माच्या भिंती तोडून नृत्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ते राजकारणाच्या माध्यमातून लोकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. नृत्याला घरातून विरोध होता का, असे विचारल्यावर ते म्हणतात, "मी एकटाच राहायचो, त्यामुळे घरच्यांच्या विरोधाची मला फिकीर नव्हती. मी लग्नही केले नाही आणि माझ्या तरुणपणातील बराच काळ भारताबाहेर व्यतीत केला." सुमारे १४ वर्षे त्यांनी कॅनडा, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये भारतीयांसाठी नृत्याचे वर्ग चालवले. परदेशात परफॉर्मन्स देऊन त्यांनी मोठे नाव कमावले आहे.

४. फातिमा मुझफ्फर अहमद: राजकारणातील वारसा आणि सेवा

चेन्नई कॉर्पोरेशनमध्ये निवडून आलेल्या फातिमा मुझफ्फर अहमद या २०२२ च्या स्थानिक निवडणुकांमध्ये तमिळनाडूमध्ये विजयी झालेल्या सहा मुस्लिम नगरसेविकांपैकी एक आहेत. राजकारण त्यांच्या रक्तातच आहे. त्यांचे वडील ए. के. अब्दुल समद हे लोकसभेचे दोन वेळा आणि राज्यसभेचे दोन वेळा प्रतिनिधी होते. फातिमा यांनी आरामात नोकरी केली असती, पण त्यांनी समाजसेवेचा मार्ग स्वतःहून निवडला.

५. कीरानूर जाकीररजा: सामान्यांचे दुःख मांडणारा लेखक

कीरानूर जाकीररजा हे तमिळ साहित्यातील एक मोठे नाव आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलेल्या लोकांच्या आयुष्यावर ते थेट भाष्य करतात. तमिळनाडू आणि केरळमधील वंचित मुस्लिम समाजातील व्यथा त्यांच्या कादंबऱ्यांमधून जिवंत होतात. त्यांचे लेखन अत्यंत धाडसी आणि प्रामाणिक आहे. यामुळेच अनेकदा सनातनी लोकांकडून त्यांच्यावर टीकाही केली जाते, पण ते आपले सत्य मांडणे सोडत नाहीत.

६. निखत फातिमा सोहेल: शिक्षणाची मशाल पेटवणारी महिला

निखत फातिमा सोहेल या चेन्नईतील 'एमडब्ल्यूए मॅट्रिक्युलेशन स्कूल'च्या प्रमुख आहेत. त्या केवळ मुख्याध्यापिका नाहीत, तर 'अकॅडमी फॉर वुमन'च्या सह-अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. मुस्लिम युवक आणि महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत.

७. नवाब झादे मोहम्मद आसिफ अली: सामाजिक सलोख्याचा चेहरा

आरकोट राजघराण्याचे वारसदार प्रिन्स नवाब झादे मोहम्मद आसिफ अली हे सामाजिक सलोखा आणि परोपकाराचा चेहरा बनले आहेत. ते एक उत्तम संगीतकारही आहेत. आरकोट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा महाल अनेक मानवतावादी उपक्रमांचे केंद्र बनला आहे. धर्माचा विचार न करता गरिबांसाठी मदतकार्य राबवण्यावर आसिफ अली यांचा भर असतो. चेन्नईच्या सांस्कृतिक आयुष्यात त्यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे.

८. मोहम्मद उस्मान: अंधांच्या आयुष्यातील नवा प्रकाश

चेन्नईच्या एका खाजगी कॉलेजमध्ये तमिळ विषय शिकवणारे अश्रफ खान आज महिन्याला ५०,००० रुपये कमावतात. लहानपणापासून अंध असलेल्या अश्रफ यांचे आयुष्य केवळ शिक्षणामुळे बदलले. या यशाचे श्रेय ते मोहम्मद उस्मान यांना देतात. उस्मान यांनी 'मदरसा इमदादिया' या ट्रस्टच्या माध्यमातून अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. या मदरसात चक्क ब्रेल लिपीतून शिक्षण दिले जाते आणि पुस्तकेही छापली जातात. मोहम्मद उस्मान यांच्या दूरदृष्टीमुळे शेकडो अंध मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.

९. मोहम्मद अक्रम: ४०० भाषांवर प्रभुत्व मिळवणारा तरुण

महमूद अक्रम या १९ वर्षांच्या तरुणाने आतापर्यंत तब्बल ४०० भाषा शिकल्या आहेत, त्यापैकी ४६ भाषा तो अस्खलित बोलू शकतो. वयाच्या १० व्या वर्षी त्याने भारताचे राष्ट्रगीत २० वेगवेगळ्या लिपींमध्ये एका तासाच्या आत लिहून दाखवले होते. १२ व्या वर्षी एका वाक्याचे सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्याचा विक्रम त्याने केला. त्याचे वडील स्वतः १६ भाषांचे जाणकार होते. अक्रम म्हणतो, "मी ४०० भाषा लिहू आणि वाचू शकतो, पण त्यापैकी मला ४६ भाषाच नीट समजतात."

१०. शरीफा खानम: महिलांच्या हक्कासाठी लढणारी वीरांगना

'स्टेप्स' (STEPS) या महिला सक्षमीकरण संस्थेच्या संस्थापक शरीफा खानम आता महिलांसाठी स्वतंत्र मशीद सुरू करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. मुस्लिम महिलांवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा त्यांच्याकडे दाद मागायला जागा नसते, असे त्यांचे मत आहे. तोंडी तलाक किंवा घरगुती हिंसाचारासारख्या प्रकरणांमध्ये पोलीस अनेकदा शरीयतचा विषय म्हणून हात झटकतात. हे प्रश्न पुन्हा पुरुषप्रधान जमातसमोर जातात, ज्याला शरीफा 'कांगारू कोर्ट' म्हणतात. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या अत्यंत धडाडीने काम करत आहेत.