सलीम अली : कंप्युटर सायन्सची पदवी बाजूला सारून जंगलाची वाट धरणारा अवलिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
सलीम अली
सलीम अली

 

श्रीलता एम

भारताचे सुप्रसिद्ध 'बर्ड मॅन' सलीम अली यांच्याप्रमाणेच हेदेखील एक सलीम आहेत आणि तसेच पक्षी व प्राणी संवर्धन कार्यकर्ते आहेत. मोहम्मद सलीम यांनी मात्र संवर्धन जीवशास्त्र किंवा साध्या जीवशास्त्राचेही शिक्षण घेतलेले नाही. त्या काळातील इतर तरुणांप्रमाणेच त्यांनीही संगणक विज्ञानात पदवी मिळवली आहे.

त्यांचे मन मात्र नेहमीच आपल्या आसपासच्या मुक्या जिवांची काळजी घेण्यात रमत असे; यामध्ये पक्षी, साप, कुत्रे आणि इतर प्राण्यांचा समावेश होता. त्यांनी धोक्यात आलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी 'द एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन ग्रुप' (ECG) नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. या संस्थेचा उद्देश प्राण्यांच्या बचावासाठी कृतिशील आणि एकाग्रतेने काम करणे हा होता.

सलीम यांनी आजवर अनेक बचाव मोहीम राबवल्या आहेत. बेकायदेशीर शिकारी आणि पाळीव प्राणी विक्रेत्यांकडून त्यांनी शेकडो वन्य प्राण्यांची सुटका केली आहे. वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी लावलेले शेकडो सापळे नष्ट करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 'वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो'ने भारतातील स्वयंसेवकांच्या पहिल्या तुकडीमध्ये त्यांची निवड करून त्यांना सन्मानित केले आहे.

सलीम आणि त्यांच्या 'ईसीजी' संस्थेने गेल्या काही वर्षांत २८ राज्यांमध्ये विविध मोहिमा राबवल्या आहेत. पक्षी आणि प्राण्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींबद्दल जनजागृती करण्यासाठी ते ओळखले जातात.

काही कॉर्पोरेट प्रायोजकांच्या मदतीने त्यांनी भारतभर चार 'सीक एक्सपीडिशन्स' (शोध मोहिमा) सुरू केल्या. या मोहिमांमध्ये त्यांनी धोक्यात आलेल्या विविध प्रजातींच्या स्थितीचा अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली, तसेच विविध राज्यांमधील शिक्षण संस्था आणि स्थानिक सरकारी संस्थांमध्ये त्यांनी जनजागृती केली.

प्राणी आणि पक्षांसाठी काम करणारी संस्था असल्याने त्यांना सतत प्राणी आणि पक्षांच्या बचावासाठी लोकांचे फोन येतात.

आम्हाला लोक मोर किंवा साप पकडण्यासाठी फोन करतात. आम्ही हे फोन या कामासाठी वाहून घेतलेल्या इतर संस्थांकडे वळवतो. आम्ही आमचे काम केवळ धोक्यात आलेल्या विशिष्ट प्राण्यांविषयी जनजागृती करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. त्यांनी सापांपासून कामाला सुरुवात केली आणि इथेच त्यांचा अनुभव वाढत गेला.

आता आम्हाला बचावासाठी फोन येतात. आम्ही स्थलांतरित पक्ष्यांवर, विशेषतः 'इंडियन पिट्टा' (नवरंग) पक्षावर लक्ष केंद्रित केले आहे.

पक्षी खाली पडल्यावर, काही कारणास्तव उडू न शकल्यास किंवा त्यांना विजेचा धक्का लागल्यास आम्हाला फोन येतात. सध्या कोइंबतूरच्या आसपासच्या भागातून प्रामुख्याने मोर वाचवण्यासाठी फोन येत असल्याचे ते सांगतात.

यातील बहुतेक फोन बचाव कार्य करणाऱ्या इतर संस्थांकडे दिले जातात. सलीम मात्र एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत होते. पक्ष्यांना वाचवण्यासाठी ते एका व्यापक आणि दीर्घकालीन योजनेवर काम करत होते. त्यामुळे २००९ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या कन्झर्वेशन ग्रुपमधील मित्रांनी 'सीक एक्सपीडिशन' सुरू केली.

दुर्मिळ प्रजाती आणि त्यांना वाचवण्याची गरज याविषयी जागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. प्रत्येक मोहिमेचा एक विशेष विषय होता. पहिली मोहीम रस्त्यांवरील अपघातात मरण पावणाऱ्या प्राण्यांविषयी होती. जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि प्राण्यांची टक्कर टाळण्यासाठी वनक्षेत्रात उड्डाणपुलांची गरज असल्याचा संदेश आम्ही दिल्याचे सलीम सांगतात.

२०१५ मध्ये त्यांच्यातील पाच जण रस्त्यावर विविध ठिकाणी गेले. त्यांनी रस्ते अपघातात मरण पावलेल्या प्राण्यांचे फोटो काढले आणि नोंदी केल्या. त्यानंतर त्यांनी आसपासच्या सरकारी शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली. रस्त्यावर प्राण्यांना खायला घालू नका, असे आम्ही लोकांना सांगितले. कारण आपणच त्यांच्या रस्ते अपघातातील मृत्यूला कारणीभूत ठरत आहोत, असे ते म्हणतात.

आम्ही पोस्टर्स आणि पत्रके तयार करून लोकांना सांगितले की, प्राण्यांना माणसांनी खायला घालण्याची गरज नाही. ते स्वतःचे अन्न स्वतः शोधू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिंद्रा मोटर्स आणि फोर्स मोटर्सने त्यांच्या या मोहिमेला प्रायोजित केले होते.

पुढील 'सीक एक्सपीडिशन'मध्ये त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशी आणि विशेषतः ईशान्य भारतातील धोक्यात आलेल्या प्रजातींवर लक्ष केंद्रित केले. ईशान्य भारत दोन कारणांसाठी महत्त्वाचा होता; एक कारण चांगले होते आणि दुसरे तितकेसे चांगले नव्हते.

चांगले कारण म्हणजे 'फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया' जादव पायेंग. आसाममधील महापुरानंतर झाडे नसलेल्या वाळूच्या पट्ट्यात सापांना मरताना पाहून त्यांनी तिथे एक संपूर्ण जंगल उभे केले.

त्यांना भेटणे प्रेरणादायी होते, असे सलीम सांगतात. ईशान्य भागात पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांत आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनीही खूप मदत केली. तिथली समस्या म्हणजे पारंपरिक शिकार. यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसारख्या धोक्यात असलेल्या काही प्रजातींना हानी पोहोचत होती. त्यांनी ज्या पक्ष्यासाठी काम हाती घेतले, तो अमूर फाल्कन (Amur Falcon) होता. हा पक्षी सायबेरियातून येतो आणि ईशान्य भारतात महिनाभरापेक्षा कमी काळ मुक्काम करून आफ्रिकेला जातो.

या काळात त्यांचे रक्षण करणे आवश्यक असते. आम्ही अमूर फाल्कनबद्दल जनजागृती केली आणि ती यशस्वी झाली, असे ते सांगतात.

त्यांची तिसरी 'सीक एक्सपीडिशन' राजस्थानमधील धोक्यात असलेल्या पक्ष्यांवर होती आणि यात मुख्य लक्ष 'ग्रेट इंडियन बस्टर्ड' (माळढोक) पक्षावर होते. उच्च दाबाच्या वीज तारा किंवा पवनचक्क्यांमुळे हे पक्षी मारले जात होते.

आम्ही मीडियातील लेख आणि इतर माध्यमांद्वारे या समस्येवर जनजागृती केल्याचे सलीम सांगतात.

हे पक्षी आकाराने मोठे असतात आणि पवनचक्की किंवा तारांच्या संपर्कात आल्यावर त्यांना वळता येत नाही. त्यामुळे ते त्यावर आदळतात आणि मरण पावतात किंवा जखमी होतात, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला गेला आणि आता उच्च दाबाच्या तारा जमिनीवरून नेण्याऐवजी जमिनीखालून नेल्या जातात. पक्ष्यांना धोक्याची सूचना मिळावी म्हणून पवनचक्क्यांना भडक रंग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१९ मध्ये कार्ल झाईस या जर्मन ऑप्टिकल उत्पादक कंपनीने प्रायोजित केलेली चौथी 'सीक एक्सपीडिशन' निवडणुकांमुळे अर्ध्यातच थांबवावी लागली आणि नंतर ती दक्षिण भारतात पुन्हा सुरू करण्यात आली. येथील परिस्थिती वेगळी आहे. इथे जनजागृती जास्त आहे आणि शिकार कमी आहे. पण झपाट्याने नष्ट होत चाललेला अधिवास ही येथील मुख्य समस्या असल्याचे ते म्हणतात.

निधीच्या कमतरतेमुळे आम्हाला काम सुरू ठेवता येत नाही. आम्ही संवर्धनात चांगले आहोत पण मार्केटिंगमध्ये कमी पडतो, असे ते खंत व्यक्त करताना म्हणतात.

हवामान बदलामुळे किनारपट्टीची धूप होत आहे. अशा वेळी अधिक जनजागृतीची गरज आहे. पण निधीअभावी आम्हाला जास्त काही करता येत नाही. मोहिमेसाठी आम्हाला वर्षाला फक्त १५ लाख रुपयांची गरज आहे. कंपन्यांसाठी ही रक्कम काहीच नाही, पण त्यांनी याला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणतात.

सलीम उत्तर केरळमधील आदिवासी आणि वर्षावनांचा प्रदेश असलेल्या 'अट्टापदी' येथे स्थलांतर करत आहेत. "मी तिथेच स्थायिक होऊन तिथल्या पर्यावरणीय समस्यांवर काम करणार आहे," असे ते सांगतात. सध्या ते कोइंबतूरमधील त्यांचे अनेक दशकांपासून सुरू असलेले काम आटोपते घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. आपली संस्था आणि कुटुंबाचा संदर्भ देत, "आम्ही सर्वजण तिथे जात आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter