युनूस आणि अंजुम : शहीदाच्या मुलीला आधार देणारे जोडपे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
हिमाचल प्रदेशचे आयएएस अधिकारी युनूस खान आणि आयपीएस अधिकारी अंजुम आरा
हिमाचल प्रदेशचे आयएएस अधिकारी युनूस खान आणि आयपीएस अधिकारी अंजुम आरा

 

मे २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर क्रूर हल्ला झाला. पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने पाकिस्तानी सैनिकांच्या वेशातील दहशतवाद्यांनी भारतीय सैनिक नायब सुभेदार परमजित सिंग यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह विद्रूप केला. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली. पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील वैनपोईन गावात परमजित यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. 

हिमाचल प्रदेशचे आयएएस अधिकारी युनूस खान आणि आयपीएस अधिकारी अंजुम आरा यांना ही बातमी अंतर्मुख करून गेली. त्या वेळी युनूस कुल्लूचे जिल्हाधिकारी होते, तर अंजुम सोलनच्या पोलीस अधीक्षक. देशभक्ती आणि कर्तव्याच्या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी परमजित यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. युनूस यांनी परमजित यांच्या भावाला फोनवर सांगितलं, “आम्ही तुमच्या कुटुंबासोबत उभे राहू इच्छितो.” गावात पोहोचल्यावर त्यांनी शहीदाच्या कुटुंबाला भेटून त्यांचं सांत्वन केलं. 

“परमजित यांचा मृतदेह गावात आला तेव्हा त्यांच्या पत्नी परमजित कौर आणि तीन मुलांच्या डोळ्यांतील वेदना पाहून आम्ही हादरलो. ती दृश्यं आम्ही विसरू शकत नव्हतो,” युनूस सांगतात. युनूस आणि अंजुम यांनी परमजित यांची मुलगी खुशदीप कौर यांना जवळ घेतलं तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला. आम्ही या मुलीला फक्त आजच नव्हे तरआयुष्यभर आधार देऊ शकतो का? “हा फक्त भावनिक होण्याचा क्षण नव्हता. ही आयुष्यभराची जबाबदारी होती,” अंजुम म्हणाल्या. 

काही क्षणांचा विचार केल्यानंतर या जोडप्याने खुशदीपच्या शिक्षणाची आणि भावनिक आधाराची पूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी खुशदीपला तिच्या कुटुंबापासून वेगळं केलं नाही. ती आपल्या आई आणि भावंडांसह पंजाबमध्येच राहील, आणि ‘शिमला वाले अंकल-आंटी’ तिच्यासाठी नेहमी हजर राहतील, असं ठरलं. “आम्हाला तिचं आयुष्य बदलायचं नव्हतं, तर केवळ तिच्या स्वप्नांना पाठबळ द्यायचं होतं,” युनूस म्हणाले. 
  
आज खुशदीप बारावीत शिकते. ती हुशार विद्यार्थिनी आहे. तिची स्वप्नं मोठी आहेत. “अलीकडेच तिने लॅपटॉप मागितला. मी तिला सांगितलं- स्वस्तात नको, चांगलं मॉडेल घे. मी तिला चांगला लॅपटॉप पाठवला,” युनूस हसत सांगतात. “कधीकधी आम्हाला आमच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागतात. कारण खुशदीपच्या गरजा आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर आहेत. कारण तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला आमच्या सगळ्या अडचणी विसरायला लावतं.” 

या सात वर्षांमध्ये दोन्ही कुटुंबांमधला नातं आणखी घट्ट झालं. सगळेजण राखी, ईद, दिवाळी एकत्रच साजरी करतात. “माझा मुलगा खुशदीप आणि तिच्या बहिणी सिमरनदीपला दरवर्षी राखी बांधतो. त्या त्याच्या सख्या बहिणी झाल्या आहेत,” अंजुम सांगतात. परमजित कौर यांना युनूस आपली बहीण मानतात. पंजाबी संस्कृतीप्रमाणे ते त्यांच्यासाठी भावाप्रमाणे पाठीशी उभे राहतात. 

खुशदीपची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेताना युनूस आणि अंजुम यांनी पूर्ण पारदर्शकता ठेवली. “आम्ही परमजित कौर आणि सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. खुशदीपला तिच्या घरापासून वेगळं करायचं नव्हतं. आम्ही फक्त आमचं घर त्यांच्या कुटुंबासाठी खुलं केलं,” युनूस सांगतात. ते नियमितपणे वैनपोईन गावात जातात आणि खुशदीपच्या कुटुंबाला शिमल्यात बोलवतात. “खुशदीप जवळपास रोज माझ्याशी किंवा अंजुमशी फोनवर बोलते,” युनूस सांगतात. 
   
युनूस हे २०१०च्या बॅचचे आयएएस अधिकारी. मालेरकोटला पंजाबचे रहिवासी. सध्या ते हिमाचल प्रदेशात राज्य कर आणि उत्पादन शुल्क आयुक्त आहेत. वाळू माफियांविरुद्ध त्यांनी कडक कारवाया केल्या. त्यामुळे एकदा त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला. अंजुम, २०११ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी मुळच्या लखनौच्या. त्या सध्या दक्षिण शिमला DIG आहेत. 

अंजुम यांची लखनौची सांस्कृतिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी असूनही परमजित यांच्या कुटुंबामध्ये त्या सहज मिसळून गेल्या याचं युनूस यांना आश्चर्य वाटतं. “अंजुमने या कुटुंबाशी जे नातं जोडलं, ते पाहून मी थक्क झालो,” ते विस्मयाने सांगतात. 

दोघांच्याही कुटुंबांनी त्यांच्या या निर्णयाला हसत पाठिंबा दिला. “माझ्या आईने सांगितलं, सामान्य माणसं स्वतःसाठी जगतात. मोठेपण दुसऱ्यासाठी जगण्यात आहे,” युनूस सांगतात. “हेच तत्त्वज्ञान अमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.” 
  
खुशदीपच्या भविष्याबाबत गावात औत्सुक्य आहे. ती सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाईल असा त्यांचा कयास आहे. पण युनूस ठामपणे सांगतात, “तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडावं. आमचं काम तिला सक्षम करणं आहे, तिचा मार्ग ठरवणं नाही. आम्हाला तिच्यावर अपेक्षांचं ओझं टाकायचं नाही.” 

ज्या काळात अनेकदा सांत्वन शब्दांपुरतं मर्यादित राहतं, त्या काळात युनूस आणि अंजुम यांनी शहीदाच्या कुटुंबाला खरी साथ दिली. “आम्ही काही विशेष केलं नाही. फक्त आमचं हृदय आणि आयुष्य एका कुटुंबासाठी खुलं केलं,” अंजुम सहजपणे सांगतात. 

गेली दिवाळी त्यांनी भारत-पाक सीमेवरील लोंगोवाल सेक्टरमध्ये सैनिकांसोबत साजरी केला. “भारतीय सैन्याशी आता आमचं वैयक्तिक नातं तयार झालं आहे. आम्ही दिवा लावतो तो देशाच्या रक्षकांसाठी,” अंजुम प्रसन्नतेने सांगतात. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter