केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या हस्ते आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी), कोट्टायम येथे 'पंतप्रधान विरासत का संवर्धन' (पंतप्रधान विकास) योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण आणि महिला उद्योजकता विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाला डॉ. चंद्र शेखर कुमार (सचिव, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय), प्रा. डॉ. प्रसाद कृष्णा (संचालक, आयआयआयटी कोट्टायम), अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि आयआयआयटी कोट्टायमचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि 'पंतप्रधान विकास' योजनेचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
यावेळी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि आयआयआयटी कोट्टायम यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार, आयआयआयटी कोट्टायम येथे अल्पसंख्याक समुदायातील ४५० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. यापैकी १५० तरुणांना 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' (IoT) मध्ये प्रशिक्षण मिळेल, तर ३०० महिलांना नेतृत्व आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय उचलेल. आयआयआयटी कोट्टायम हे या प्रकल्पासाठी अंमलबजावणी करणारी संस्था असेल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना विद्यावेतन मिळेल. त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींसाठीही मदत केली जाईल.
आपल्या भाषणात राज्यमंत्र्यांनी 'पंतप्रधान विकास' योजनेचे फायदे अधोरेखित केले. कौशल्य विकास आणि उद्योजकतेतून अल्पसंख्याक समुदायांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण करणे, रोजगार क्षमता वाढवणे आणि उद्योगांच्या विकासाला पाठिंबा देणे हा या योजनेचा उद्देश आहे. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आकांक्षा समजून घेतल्या.
आयआयआयटी कोट्टायम हे तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि इनक्यूबेशनवर लक्ष केंद्रित करणारी एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेत हा प्रकल्प राबवल्यामुळे केरळमधील अल्पसंख्याक समुदायांमध्ये क्षमता वाढीस आणि कौशल्य विकासाला मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.