NEET मुद्द्यावर संसदेत चर्चेला सरकार तयार; राहुल गांधींचे पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
विरोधी पक्षनेते राहुल गांधी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी

 

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि त्यासंबंधीच्या आंदोलनाबाबत संसदेत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली.

पीएमओचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी यांनी चर्चेच्या मागणीसोबतच आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवी अट ठेवल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

चर्चेच्या मागणीवरून राहुल गांधींचे घूमजाव: जितेंद्र सिंह
डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी चर्चेच्या आधीच्या मागणीवरून माघार घेतली असून, विरोधी पक्षनेत्यासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीला हे शोभत नाही. "काँग्रेसने या गंभीर विषयावर नियमांनुसार संसदेत औपचारिक चर्चेसाठी अद्याप कोणतीही नोटीस दिलेली नाही. तरीही सरकार नीटशी संबंधित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे," असे सिंह यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केले होते. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या विरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे नेते रस्त्यावर उतरले होते. आंदोलनस्थळ हे निदर्शनांसाठी राखीव नसल्याने आणि नागरिकांना त्रास होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवण्यात आले होते.

पोलिसांकडून राहुल गांधींसह वरिष्ठ नेत्यांना अटक
जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी सुरुवातीला संसदेत चर्चेचे आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले होते. सरकारने वरिष्ठ पातळीवर मंजुरी घेऊन चर्चेची तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी अट बदलत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोडली.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई करत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतले. संसदेच्या आगामी सत्रात या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.