यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

शिक्षणाचा बाजार मांडलेल्या कोचिंग क्लासेसना आता केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वांमुंळं चाप बसणार आहे. कारण सरकारनं आणलेल्या नव्या नियमावलीनुसार १६ वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची दिशाभूल करणारी जाहिरातही करता येणार नाही. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोचिंग सेंटर्सचं नियमन आणि त्यांना कायदेशीर चौकटीत आणण्याची गरज होती. तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रण वाढीवर रोख लावण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंगच्या घटनांमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडं आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?
कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाहीत.
कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत
पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी.
दिशाभूल करणारी जाहीर कोणतीही कोचिंग संस्था करु शकत नाही.
कोचिंग सेंटर्स नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाहीत.
या मार्गदर्शक तत्त्वांच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही.
कोचिंग सेंटर्सकडे ट्यूटरची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असावी.