पाकिस्तानात घुमणार संस्कृतचा नाद! फाळणीनंतर प्रथमच लाहोरच्या विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तानातील एका विद्यापीठात प्राचीन संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) ने हा अभ्यासक्रम सुरू केला असून, भविष्यात यात महाभारत आणि गीतेसारख्या हिंदू पौराणिक ग्रंथांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे दक्षिण आशियाई वारसा पुन्हा मिळवण्याच्या आणि प्रादेशिक सांस्कृतिक समज वाढवण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल टाकल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.

अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि प्रतिसाद

'इन्ट्रोडक्शन टू संस्कृत लँग्वेज अँड लिटरेचर' (संस्कृत भाषा आणि साहित्याचा परिचय) असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. सुरुवातीला २०२५ च्या सुरुवातीला हा केवळ तीन महिन्यांचा शनिवार-रविवार (वीकेंड) चालणारा एक छोटासा कार्यशाळा (वर्कशॉप) म्हणून सुरू झाला होता. मात्र, याला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहून याचे रूपांतर पूर्ण चार-क्रेडिटच्या विद्यापीठ अभ्यासक्रमात करण्यात आले. हा अभ्यासक्रम ९ डिसेंबर २०२५ रोजी औपचारिकपणे पूर्ण झाला.

या अभ्यासक्रमात पदवीचे विद्यार्थी, संशोधक आणि विविध विषयांतील प्राध्यापकांनी सहभाग घेतला. अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणाचा पाया आणि महाभारत व भगवद्गीतेसह अभिजात ग्रंथांच्या अभ्यासाचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मूळ उतारे, तात्विक संकल्पना आणि ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास केला, तसेच महाभारतातील प्रसिद्ध कथांचे उर्दू रूपांतराच्या मदतीने या प्राचीन भाषेशी जुळवून घेतले.

गुरमानी सेंटर फॉर लँग्वेजेस अँड लिटरेचरचे संचालक अली उस्मान कासमी यांनी सांगितले की, "आम्ही हा प्रतिसाद पाहिल्यानंतरच याला नियमित विद्यापीठ अभ्यासक्रम बनवण्याचा निर्णय घेतला". जरी विद्यार्थ्यांची संख्या सध्या कमी असली (सुमारे ७ ते ८ विद्यार्थी), तरी त्यांचा उत्साह आणि वचनबद्धता मोठी होती आणि सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या स्तरासाठी (लेव्हल २) प्रवेश घ्यायचा आहे. विद्यापीठाचे शुल्क जास्त असल्याने आणि अनेकांना ते परवडणारे नसल्याने ही संख्या कमी असली तरी, येत्या काही वर्षांत ती वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. स्प्रिंग २०२७ पर्यंत ही भाषा वर्षभराचा अभ्यासक्रम म्हणून शिकवता येईल, असा आदर्श विचार असल्याचे संचालकांनी सांगितले. तसेच, स्प्रिंग २०२६ साठी विशेष फॉलो-अप कोर्सेसचे नियोजन केले आहे.

डॉ. शाहिद रशीद : या उपक्रमाचे संयोजक 

या उपक्रमाच्या केंद्रस्थानी डॉ. शाहिद रशीद आहेत. ते फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमध्ये समाजशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ५२ वर्षीय रशीद हे मूळचे अभियंता असून नंतर ते समाजशास्त्राकडे वळले. त्यांना भाषेची प्रचंड आवड असून संस्कृत शिकणे हा त्यांचा एक 'पॅशन प्रोजेक्ट' होता.

१५ वर्षांपूर्वी त्यांना योगायोगाने 'सेल्फ-टीच संस्कृत' नावाचे एक पुस्तक मिळाले आणि तिथून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. पाकिस्तानात संस्कृत शिकवण्यासाठी शिक्षक किंवा पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियातील प्राध्यापक, अमेरिकेतील ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि भारतीय स्वयंसेवी संस्थांच्या युट्युब चॅनेलच्या मदतीने संस्कृतचे धडे गिरवले. आता त्यांच्याकडे संस्कृत पुस्तकांचा पूर्ण कपाट भरलेला साठा आहे, जो त्यांनी परदेशात जाणाऱ्या मित्रांकडून मागवून घेतला आहे.

डॉ. रशीद म्हणतात, "लोक मला विचारतात की मी संस्कृत का शिकत आहे? मी त्यांना सांगतो, आपण ती का शिकू नये? ही संपूर्ण प्रदेशाला जोडणारी भाषा आहे. संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांचे गाव याच भागात होते. सिंधू संस्कृतीच्या काळात येथेच खूप लेखन झाले. संस्कृत ही एका पर्वतासारखी आहे - एक सांस्कृतिक स्मारक. आपल्याला ते स्वीकारणे आवश्यक आहे. ती आपलीही आहे; ती कोणत्याही एका धर्माशी जोडलेली नाही".

डॉ. रशीद सध्या उर्दूमध्ये संस्कृत व्याकरणाचा पहिला सर्वसमावेशक ग्रंथ लिहित आहेत, जो तीन खंडांमध्ये असेल.

सांस्कृतिक वारशाचे जतन आणि भविष्यातील उद्दिष्टे

फाळणीपूर्वी लाहोर ते बनारसपर्यंतच्या विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यास जोरात सुरू होता, परंतु १९४७ नंतर धार्मिक संवेदनशीलता आणि भू-राजकीय तणावामुळे ही भाषा शैक्षणिक जीवनाच्या परिघाबाहेर गेली. पंजाब विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५,००० हून अधिक संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह आहे, ज्याचा १९४७ पासून कोणत्याही पाकिस्तानी अभ्यासकाने अभ्यास केलेला नाही. १९३० च्या दशकात विद्वान जे.सी.आर. वुलनर यांनी या ताडपत्रावरील हस्तलिखितांची सूची तयार केली होती.

गुरमानी सेंटरचे संचालक अली उस्मान कासमी म्हणतात, "केवळ परदेशी संशोधकच याचा वापर करतात. स्थानिक स्तरावर विद्वानांना प्रशिक्षण दिल्यास हे चित्र बदलेल". ते पुढे म्हणतात, "पुढील १०-१५ वर्षांत आपल्याला पाकिस्तानातील गीतेचे आणि महाभारताचे अभ्यासक पाहायला मिळू शकतात".

या उपक्रमाकडे 'सांस्कृतिक दुवा' म्हणून पाहिले जात आहे. डॉ. रशीद यांनी याला दक्षिण आशियातील तात्विक, साहित्यिक आणि आध्यात्मिक परंपरांना आकार देणाऱ्या भाषेच्या गंभीर अभ्यासाला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक लहान तरीही महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, "जर आपण लोकांना जवळ आणू इच्छित असू, तर आपल्या समृद्ध अभिजात परंपरा समजून घेणे आवश्यक आहे. कल्पना करा की जर भारतातील अधिक हिंदू आणि शिखांनी अरबी शिकणे सुरू केले आणि पाकिस्तानातील अधिक मुस्लिमांनी संस्कृत शिकले, तर दक्षिण आशियासाठी ही नवीन आशादायक सुरुवात होऊ शकते. जिथे भाषा अडथळ्यांऐवजी पूल बनेल."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter