प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं अतिशय औपचारिक होत चाललंय. रोजगाराचे उपचार म्हणून मास्तरकी करणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना फारतर लिपी, गणिती आकडेमोड व पुस्तकी शिक्षण दिलं जातं. पण विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाकडे लक्ष दिलं जाईलच यात्री खात्री नसते.
शहरी भागात शिक्षणाची औपचारिकता आधिकच वाढीस लागली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी नसल्यामुळे जागतिक ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षा व त्याच्या फायद्यांपासून ते दूर आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यप्रधान शिक्षण व मैत्रीपूर्ण वातावरणातील कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘एम्स’ (AIMS - एशिअन इनोव्हेशन मॉडर्न स्कूल) या शाळेची सोलापूर जवळील वळसंग या गावात सुरुवात करण्यात आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर हे विद्यार्थी कौशल्य विकास, स्वातंत्र्य, शिक्षण आणि बालपणाचा मुक्त आनंद घेत एम्समध्ये वावरत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. शाळेत एखादा पाहूणा आला की, विद्यार्थी स्वतःहून त्याला भेटतात. त्याच्याशी संवाद साधतात. पाहूणे शाळेत आले की ते विद्यार्थ्यांना त्यांची ओळख म्हणजे नाव, गाव विचारतात. पण येथे हा अनुभव उलट आहे. विद्यार्थीच आलेल्या पाहुण्यांना त्यांची ओळख विचारतात. त्यांच्यातला मोकळेपणा पाहिल्यानंतर त्यांच्यातील सामाजिक संवादाविषयीचा धीटपणा आणि भान आपल्याला त्यांच्याशी आधिक संवाद साधण्यास उद्युक्त करतं.
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या या सामाजिक भानाविषयी मुख्याध्यापिका मिसबाह शेख सांगतात, ‘‘शहरातील विद्यार्थी शाळेत बोलताना घाबरतात. तेथे ग्रामीण विद्यार्थ्यांची स्थिती आधिक बिकट असते. त्यांनी मोकळेपणाने बोलावं. त्यांच्यातील स्टेजफीअर निघून जावं यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवले. सुरुवातीला आम्ही हसण्याच्या स्पर्धा घेतल्या. विद्यार्थ्यांनी स्टेजवरुन येऊन जोरजोरात हसावं. जो चांगला हसेल त्याला पुरस्कार असे त्या कार्यक्रमाचे स्वरुप होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात खूप मजा केली. हसल्यानंतर पुरस्कार मिळत असेल तर विद्यार्थी मोकळेपणाने हसायला तयार होतात.”
त्या पुढे म्हणतात, “मुलांना बक्षिस मिळालं आणि आम्हाला त्यांच्यातला मोकळेपणा. सुरुवातीच्या कार्यक्रमात आम्ही आमच्या साठ विद्यार्थ्यांपैकी किमान वीस विद्यार्थ्यांना बक्षीस मिळेल अशी व्यवस्था केली. त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं. पहिले तीन आठवडे नुसत्या हसण्याचा स्पर्धा घेतल्या. त्यानंतर हसवण्याची स्पर्धा घेतली. विद्यार्थी विनोद सांगायला लागले. मग गाण्याच्या, नाचण्याच्या स्पर्धा घेतल्या.’’
दर शुक्रवारी शाळेत ओपन स्टेज ही संकल्पना राबविली जाते. विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी मोकळीक दिली जाते. यादिवशी शाळेत सकाळच्या सत्रात काहीच शिकवले जात नाही. त्यामुळे आठवड्याभरात मुले कधीही शाळेला सुट्टी घेतील. पण शुक्रवारी शाळेचा पट शंभर टक्के असतो. महिन्यातील पाच शुक्रवापैकी एका शुक्रवारी फिल्ड व्हिजीट केली जाते. परिसरातील साखर कारखाने, सुतगिरणी, दर्गाह, मंदिर, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या मनात सर्वधर्मसमभाव आणि वाढीस लागावा यासाठी असे उपक्रम आवर्जून राबवले जातात.
शाळेत हाताची घडी तोंडावर बोट वगैरेसारखे विद्यार्थ्यांना शांत करणारे प्रकार नाहीत. विद्यार्थ्याने शिक्षकांसमोर ताठ मानेने पाठीमागे हात बांधून उभे रहावे, असा दंडक आहे. त्यातून विद्यार्थ्यांमधील बुजरेपणा, भिती निघून जाते, असं शाळेच्या मुख्याध्यापिका मिसबाह शेख सांगतात.
त्या म्हणतात, ‘‘आज आमच्या शाळेतील विद्यार्थी एखाद्या कार्यक्रमाची तयारी स्वतः करतात. सभागृहातील मंच सजवण्यापासून खुर्च्या लावण्यापर्यंतची जबाबदारी विद्यार्थी पार पाडतात. त्यानंतर कार्यक्रमातील पाहुण्यांचा सत्कार देखील विद्यार्थी करतात. सुरुवातीला गोंधळ उडायचा. पण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हे सर्व करावं, या मतावर आम्ही ठाम होतो. आता विद्यार्थ्यांना याची सवय झाली आहे.’’
कोणताही कार्यक्रम असला की, सत्कारासाठी आणि कार्यक्रमातील सुत्रसंचालनासाठी विद्यार्थी निवडण्याची पद्धतदेखील खूप चांगली आहे. आठवड्याभरात ज्या विद्यार्थ्याची वर्तणूक चांगली असेल. आठवडाभर हजर असेल. अशा विद्यार्थ्याला स्टुडंट ऑफ द विक हा पुरस्कार दिला जातो. अशा विद्यार्थ्याचे फोटो दर्शनी भागात आठवडाभर स्टँडी बोर्डवर लावले जातात.
या बोर्डचे अनावरण देखील त्या विद्यार्थ्याच्या हस्तेच केले जाते. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना प्रश्न विचारण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोणते प्रश्न विचारावेत हे शिक्षक त्यांना सांगत नाहीत. विद्यार्थी स्वतः त्यांना वाटेल ते प्रश्न विचारतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला आहे.
शाळेच्या परिसरात १५०० झाडे लावली आहेत. यापैकी काही झाडांच्या देखभालीची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. विद्यार्थी ही जबाबदारी मोठ्या कुतुहलाने पार पाडतात. शाळेतील एका फलकावर विद्यार्थ्यांनी काहीतरी लिहीलेल्या चिठ्ठ्या आपल्याला दिसतात.
या चिठ्ठ्यांविषयी मिसबाह शेख सांगतात, ‘‘विद्यार्थ्यांना अनेकदा काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात. पण विद्यार्थी ही बाब बोलून दाखवत नाहीत. त्यांच्या मनातील हे साचलेपण त्यांच्या व्यक्तीमत्वात अनेक दोष निर्माण करतं. मग आम्ही ‘ब्रेन डंप स्टेशन’ हा फलक लावला.”
त्या पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना आम्ही दररोज तळहाताच्या आकाराचा कागदाचा तुकडा देतो. त्यावर दिवसभरात खटकलेल्या, आवडलेल्या, ज्याविषयी राग आलाय ते सारं काही लिहावं असं सांगतो. सुरुवातीस विद्यार्थी काहीबाही लिहायचे. आता त्यांना एक लय गवसलीय. ते चांगल्याप्रकारे अभिव्यक्त होतात.’’
विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने वागण्यासाठी शिक्षकांना तयार करणेच आव्हानात्मक होते. हे करण्यासाठी काही योजनांवर काम केल्याचे सरफराज अहमद सांगतात, ‘‘शिक्षकांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण नाते विकसित व्हावे म्हणून आधी आम्ही प्रयत्न केले. शाळेत शिक्षकांचा वाढदिवस साजरा करण्यापासून यासाठी अनेक योजनांवर काम केले.”
ते पुढे म्हणतात, “शाळा ही आपल्या रोजगाराचे केंद्र नसून ती वेगवेगळ्या संकल्पना राबवत विद्यार्थ्यांना घडवण्याचे एक माध्यम आहे, हे आम्ही शिक्षकांवर ठसवले. त्यासाठी म्हैसूरचे सय्यद शजीर हसन यांचे मार्गदर्शन शिबीर घेतले. सोबतच छडी हा प्रकार शाळेतून आम्ही बाद केला. शक्य तितके विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर आमचा भर आहे.”
अशा प्रयत्नांमुळे शाळेत एक मोकळेपणा आला आहे. विद्यार्थी शिक्षकांशी बोलताना चाचरत नाहीत. त्यावर शिक्षिका शाहीन शेख म्हणतात, ‘‘स्वातंत्र्य दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाले आहे. त्यांच्यावरील दडपण दूर करण्याचे आव्हान आम्ही स्विकारले. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’
ज्यापध्दतीने शाळेत वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आहेत, त्याचप्रकारे त्याची रचनादेखील वैविध्यपूर्ण आहे. शाळेचा परिसर निसर्गरम्य आहेच, पण सोबतच वैविध्यपूर्ण आहे. शाळेच्या दर्शनीभागात कोनशिलेच्या स्वरुपात प्रेषित मोहम्मदांनी त्यांच्या जीवनातील अखेरच्या हजयात्रेत दिलेले भाषण लावले आहे. विद्यार्थी किंवा शिक्षक कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे भाषण वाचतात.
त्यात लिहिलेले आहे की, ‘‘आम्ही काळ्या गोऱ्यांमध्ये भेद करणार नाही. व्याजाच्या माध्यमातून आर्थिक शोषण करणार नाही. मजूराचे, स्त्रीयांचे शोषण करणार नाही. आम्ही न्याय करु, हिंसेपासून दूर राहू’’ वगैरे समतेच्या आणि मानवतेच्या मुल्यांचा धडा विद्यार्थ्यांना बालपणापासून मिळतोय हे किती महत्वाचे आहे.
या कोनशिलेच्या बाजूला विविध प्रकारची चित्रं मध्ययुगीन काळातील इस्लामी ज्ञानक्रांतीला अधोरेखित करतात. अल् किंदी, जाबीर बिन हय्यान, फाराबी वगैरे लोक जे इस्लामच्या अगदी सुरुवातीच्या काळात इस्लामी ज्ञानक्रांतीची प्रेरणा घेऊन खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्रात संशोधन करायचे, त्यांची चित्रे रेखाटली आहेत.
शिवाय शाळेतील वर्गांच्या समोरच ‘हाऊस ऑफ विस्डम’ नावाचे सभागृह आहे. अब्बासीद खलीफांच्या काळातील बगदादमधील जगप्रसिद्ध ‘बैतुल हिकमत’पासून प्रेरणा घेऊन हे नाव ठेवण्यात आले आहे. सभागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी सुफी निजामुद्दीन औलीया आणि अमीर खुसरो यांचे चित्र आहे. इतिहासातील आदर्श शिक्षक व शिष्य ही संकल्पना त्यामागे आहे. सभागृहात गालीबचे पंधरा फुट उंचीचे भित्तीचित्र आहे. बालवयात विद्यार्थ्यांना हे सर्व महापुरुष शाळेत दररोज दिसतात. शिवाय शाळेत संविधानाच्या प्रस्ताविकेचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या हस्तेच करण्यात आले आहे.
शिवाजी महारांजाचे वृक्षसंरक्षणाचे पत्र, विनोबा भावेंचे सुरह फातेहाचे भाषांतर, म. फुलेंचे मानव मोहम्मद पोवाड्याचे भित्तीचित्र साकारले जात आहे. सध्या शाळेत ६० विद्यार्थी आहेत. त्यापैकी फक्त तीस विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते. आणि उर्वरीत तीस विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. शाळा स्वयंअर्थसहाय्याच्या संकल्पनेवर गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवण्याचा संस्थेचा मानस आहे.
वळसंगच्या मातीत रुजलेला हा 'एम्स'चा अनोखा प्रयोग शाळा नव्हे तर उद्याच्या भारताची प्रयोगशाळा आहे. इथे मुलांना केवळ अक्षरे गिरवायला शिकवले जात नाही, तर माणूस म्हणून घडवले जात आहे. भिंतीवरच्या चित्रांमधून डोकावणारे गालिब आणि शिवाजी महाराज, आणि मैदानावरील 'ओपन स्टेज'वर व्यक्त होणारी ही मुले... हे चित्र शिक्षणाची खरी दिशा पुस्तकात नाही, तर मोकळ्या आकाशाखाली आणि मुक्त संवादात आहे, हीच बाब अधोरेखित करतात… महाराष्ट्राच्या एका ग्रामीण भागात पेटलेली ही ज्ञानज्योत भविष्यात राज्यालाच नव्हे तर देशाला उजळवून टाकेल यात शंका नाही.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter