मलिक उझैर : काश्मीर खोऱ्यात गगनभरारी घेणारा छोटा शास्त्रज्ञ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
मलिक उझैर त्यांच्या कुटुंबासमवेत
मलिक उझैर त्यांच्या कुटुंबासमवेत

 

ओनिक महेश्वरी

नववीत शिकणाऱ्या मलिक उझैर या विद्यार्थ्याने वयाच्या अवघ्या १३ वर्षी ३१ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि एक वेबसाईट विकसित केली आहे. या कामगिरीमुळे त्याने तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

उझैरचा कोडिंग आणि अ‍ॅप डेव्हलपमेंटचा प्रवास २०२१ मध्ये सुरू झाला. त्यावेळी मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स नक्की कशा चालतात, हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. वडिलांच्या एका मित्राला अ‍ॅप डेव्हलपमेंटचे काम करताना पाहिल्यावर त्याला पहिली प्रेरणा मिळाली. ते श्रीनगरच्या डाऊनटाउनमधील ईदगाह जवळील सैदपोरा भागात त्यांच्या घराजवळच राहायचे. त्या प्रसंगामुळे उझैरची उत्सुकता वाढली. त्याला स्क्रीनच्या मागे नेमके काय घडते हे जाणून घ्यायचे होते.

'आवाज-द-व्हॉईस'सोबत बोलताना उझैर म्हणतो की, "सगळ्या गोष्टी कशा चालतात, हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. त्या कुतूहलामुळेच मी स्वतःहून या गोष्टी शिकायला प्रेरित झालो."

शिकण्यासाठी उझैरने इंटरनेटची मदत घेतली. यूट्यूब ट्युटोरियल्स, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स आणि ॲडव्हान्स कोर्सेस हाच त्याचा वर्ग बनला. गेल्या काही वर्षांत त्याने वेब डेव्हलपमेंट आणि मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटशी संबंधित डझनभर ऑनलाइन कोर्सेस पूर्ण केले आहेत. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता, असे तो सांगतो. 

तो म्हणतो की, "मी लहान होतो आणि अनेक संकल्पना समजणे कठीण होते, पण IT क्षेत्रात मनापासून रस असल्याने मी हार मानली ना."

उझैरने हॉटेल आणि वाहन बुकिंगसाठी छोटे अ‍ॅप्स तयार करून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. स्थानिक लोकांना घरबसल्या हॉटेल किंवा वाहने बुक करता यावीत, हा यामागील उद्देश होता. सध्या हॉटेलशी संबंधित अनेक अ‍ॅप्स पडताळणी प्रक्रियेत असून लवकरच ती अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होतील.

AI च्या वाढत्या प्रभावामुळे प्रेरित होऊन उझैरने चॅटबॉट डेव्हलपमेंटमध्येही पाऊल टाकले. आतापर्यंत त्याने किमान ७ एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत. यामध्ये साध्या संभाषणापासून ते उपयुक्त मदतनीसापर्यंतच्या बॉट्सचा समावेश आहे. याविषयी उझैर सांगतो,  "AI हेच भविष्य आहे. ते कसे काम करते आणि लोकांच्या मदतीसाठी त्याचा वापर कसा होऊ शकतो, हे मला समजून घ्यायचे होते."

उझैरचे प्रकल्प केवळ व्यावसायिक नाहीत. त्याने दोन शाळांसाठी स्कूल इन्फॉर्मेशन सिस्टीम देखील विकसित केली आहे. या प्रणालीमुळे शाळांना ऑनलाइन उपस्थिती, फी व्यवस्थापन, थकीत फीचा मागोवा घेणे आणि गृहपाठ जमा करणे या गोष्टी डिजिटल पद्धतीने करता येतात. सध्या हे अ‍ॅप्स केवळ निमंत्रितांसाठी असून त्यांचा वापर मर्यादित आहे.

उझैरचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प फ्रीवान्स हा आहे. सध्या हे वेब-आधारित प्लॅटफॉर्म म्हणून उपलब्ध असून लवकरच याचे मोबाईल अ‍ॅप येणार आहे. फ्रीवान्स हे विना-कमिशन मॉडेलवर तयार करण्यात आले आहे.

इतर फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्स १०% ते २०% कमिशन आकारतात. याउलट फ्रीवान्सवर तुम्हाला फक्त १० किंवा २० रुपयांच्या नाममात्र शुल्कात नोकरीसाठी अर्ज करता येतो. ग्राफिक डिझाइन, लोगो डिझाइन, वेब डेव्हलपमेंट आणि इतर आयटी कौशल्यांमधील कामे येथे उपलब्ध आहेत. भविष्यात या प्लॅटफॉर्मवर डिजिटल मालमत्तेची खरेदी-विक्री देखील करता येईल.

याविषयी उझैर सांगतो की, "लहान व्यावसायिक आणि तरुण वर्गावर कोणताही अतिरिक्त बोजा पडू नये, हे माझे ध्येय आहे. तंत्रज्ञान हे अडथळा नसून मदतगार ठरले पाहिजे."

काश्मीरमधील सामाजिक परिस्थितीबद्दल बोलताना उझैरला वाटते की, आज तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, "आज अनेक तरुण फोनचा गैरवापर करतात किंवा वाईट सवयींच्या आहारी जातात. त्याच फोनचा वापर कौशल्ये शिकण्यासाठी आणि काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी केला, तर तंत्रज्ञान एक वरदान ठरू शकते."

उझैर आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देतो. सुरुवातीला त्याच्या घरच्यांना त्याच्या या आवडीची खोली माहित नव्हती, पण कालांतराने त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. तो म्हणतो की, "परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलेतो."

फ्रीवान्स आणि इतर प्रकल्पांच्या माध्यमातून उझैरने कॅनडा आणि अमेरिकेतील ग्राहकांसोबतही काम केले आहे. वयापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असते, यावर त्याचा विश्वास आहे. तो म्हणतो की, "परदेशातील लोक वय पाहत नाहीत, तर ते फक्त कामाचा दर्जा बघतात."

उच्च शिक्षणासाठी आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश घेण्याचे उझैरचे स्वप्न आहे. तो सध्या एका एआय-आधारित व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅपवर काम करत आहे. या अ‍ॅपमध्ये वापरकर्ते फक्त प्रॉम्प्ट्स देऊन व्हिडिओ एडिट करू शकतील.

तरुणांना संदेश देताना उझैर म्हणतो की, "मी हे करू शकत नाही, असा विचार कधीच करू नका. जिद्द असेल तर काहीही शक्य आहे." आयटी कौशल्ये शिकण्यासाठी त्याने 'अपना कॉलेज' या यूट्यूब चॅनेलची शिफारस तरुणांना केली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter