कोहिनूर हिऱ्याच्या कथा जगभर प्रसिद्ध आहेत, पण भारताच्या ऐतिहासिक वैभवात कोहिनूरपेक्षाही दुप्पट आकाराचा आणि त्याहून अधिक तेजस्वी हिरा दडलेला आहे, हे फार थोड्यांना ठाऊक आहे. विशेष म्हणजे एकेकाळी एका भारतीय राजाने आज ४०० कोटी रुपये किंमत असलेला हा मौल्यवान हिरा चक्क आपल्या टेबलावर पेपरवेट म्हणून वापरला होता. हा राजा म्हणजे हैदराबादचे निजाम आणि तो हिरा म्हणजे प्रसिद्ध जॅकब डायमंड.
हैदराबादच्या निजामांच्या त्या अफाट खजिन्याचे पुढे काय झाले? ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) तिजोरीत कसे बंदिस्त झाले, जाणून घेऊयात या लेखातून.
जॅकब डायमंड: जगातील दुर्मिळ रत्न
निजामाच्या या खजिन्यात एकूण १७३ अत्यंत दुर्मिळ दागिने आहेत, पण यातील 'जॅकब डायमंड' हा सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. १८4 कॅरेटचा हा हिरा आकाराने कोहिनूरच्या दुप्पट आहे. इतिहासात हा हिरा केवळ दोनदाच एका हातातून दुसऱ्या हातात हस्तांतरित झाला. शेवटचे निजाम उस्मान अली खान यांना हा हिरा त्यांच्या वडिलांच्या बुटाच्या टोकामध्ये सापडला होता. त्याचे खरे मोल न समजल्याने त्यांनी अनेक वर्षे हा मौल्यवान ठेवा एक साधा काचेचा तुकडा समजून टेबलावरील कागद उडू नयेत म्हणून पेपरवेटसारखा वापरला. आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
दागिन्यांचा अद्भूत संग्रह
हा खजिना केवळ हिऱ्यापुरता मर्यादित नाही. यात कोलंबियाचे पाचू, बसराचे मोती आणि आता नामशेष झालेले गोवळकोंड्याचे हिरे यांचा समावेश आहे. या संग्रहातील सतलडा हा सात पदरी मोत्यांचा हार कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. या संपूर्ण खजिन्यात मिळून तब्बल २५,००० हिरे आणि २,००० पाचू आहेत.
निजामाच्या पगडीवर लावला जाणारा सरपेच पाहण्यासारखा आहे. ब्रिटिश राजवटीत राणी व्हिक्टोरिया भारताची सम्राज्ञी झाल्यानंतर भारतीय राजांना मुकुट घालण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे आपले वैभव दर्शवण्यासाठी हे राजे पगडीवर नक्षीदार सरपेच लावत असत. याशिवाय या संग्रहात हिऱ्यांचे पैंजणही आहेत, ज्यात गोवळकोंड्याचे हिरे आणि लटकते मोती वापरण्यात आले आहेत.
खजिन्याचा प्रवास
स्वातंत्र्यानंतर या खजिन्याच्या मालकीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर १९९५ मध्ये भारत सरकारने प्रदीर्घ कायदेशीर लढाई जिंकून हा संपूर्ण खजिना आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून देशाची ही अनमोल संपत्ती मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे.
संसदेत चर्चा आणि सरकारची भूमिका
हा खजिना प्रदर्शनासाठी खुला करावा, अशी मागणी वारंवार होत असते. नुकतेच संसदेच्या चालू अधिवेशनात राज्यसभेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. हा खजिना प्रदर्शनासाठी हैदराबादला नेला जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. "निजामाचे १७३ दागिने आरबीआयच्या ताब्यात सुरक्षित आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सध्यातरी हा खजिना हैदराबादला हलवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे, हा डोळे दिपवणारा खजिना पाहण्यासाठी इतिहासप्रेमी आणि सामान्य नागरिकांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे, हे निश्चित. तरीही, आरबीआयच्या अंधाऱ्या तिजोरीत बंद असलेला हा खजिना भारताच्या समृद्ध आणि शाही इतिहासाची साक्ष देत आजही तितक्याच लकाकीने चमकत आहे.