एकीकडे देशाच्या काही भागांतून धार्मिक तणावाच्या बातम्या येत असताना, उत्तराखंडमधील कोटद्वार शहरातून माणुसकी आणि भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका मुस्लीम दुकानदाराला त्याच्या दुकानाच्या नावावरून धमकावणाऱ्या जमावासमोर एक स्थानिक हिंदू तरुण ढाल बनून उभा राहिला. "माझं नाव 'मोहम्मद दीपक' आहे," असे म्हणत त्याने नफरत पसरवणाऱ्यांची तोंडे बंद केली.
कोटद्वारमधील पटेल मार्ग परिसरात गेल्या ३० वर्षांपासून ७० वर्षीय वकील अहमद 'बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर' नावाचे दुकान चालवत आहेत. २६ जानेवारी रोजी काही तरुण या दुकानावर पोहोचले आणि त्यांनी स्वतःला एका संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. "तुम्ही मुस्लीम असून दुकानाला 'बाबा' असे नाव का दिले? हे नाव हिंदू ओळखीशी संबंधित आहे, त्यामुळे ते तातडीने बदला," अशी धमकी त्यांनी अहमद यांना दिली.
हळूहळू या तरुणांचा आवाज वाढला आणि तिथे जमाव जमू लागला. वकील अहमद आणि त्यांचा मुलगा शोएब अहमद यांना घेरले गेले. अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या कुटुंबाला अचानक भीतीचे वातावरण अनुभवावे लागले.
अशा तणावपूर्ण वातावरणात जेव्हा लोक शांत राहणे पसंत करतात, तेव्हा शेजारीच जिम चालवणारा दीपक कुमार नावाचा तरुण मदतीला धावून आला. त्याने केवळ या तरुणांच्या तर्कावर प्रश्नच उपस्थित केले नाहीत, तर "मुस्लीम या देशाचे नागरिक नाहीत का? तुम्ही तुमचे नाव बदलणार का?" असे विचारत जमावाला रोखले.
जेव्हा जमावातील एकाने दीपकला त्याचे नाव विचारले, तेव्हा त्याने नफरतीच्या विचारांवर प्रहार करत उत्तर दिले— "माझं नाव मोहम्मद दीपक आहे." दीपकच्या या विधानाचा अर्थ धर्मांतर नव्हता, तर "मी आधी माणूस आहे आणि मानवी हक्कांसाठी कोणत्याही धर्माच्या बाजूने उभा राहू शकतो," असा त्याचा ठाम विश्वास होता.
विजय रावत यांची खंबीर साथ
दीपकसोबत त्याचा मित्र विजय रावत हा देखील तिथे हजर होता. या दोघांनी मिळून जमावाला शांत केले आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचवली. विजय रावत यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की, "सर्वात मोठा धर्म माणुसकीचा असतो. आमचा हिंदू धर्म कोणाला मारणे किंवा शिवीगाळ करणे शिकवत नाही. चूक माणूस करतो, पूर्ण धर्म नाही. आपण माणुसकीची मिसाल दिली पाहिजे."
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेत दीपकचे कौतुक केले. "उत्तराखंडचा दीपक हा भारताचा खरा 'हिरो' आहे, जो संविधान आणि माणुसकीसाठी उभा राहिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू सिंह आहेस," अशा शब्दांत गांधींनी त्याचे मनोबल वाढवले. खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इतर अनेक नेत्यांनीही दीपकच्या धैर्याची प्रशंसा केली.
दुकानदार वकील अहमद यांनी आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या हिंदू बांधवांचे आभार मानले आहेत. "येथे आम्ही सर्व समुदाय एकत्र राहतो. कोणी हिंदू असो वा मुस्लीम, जो पीडित आहे त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सध्या या परिसरात शांतता असून दुकानदाराने आपले नाव न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
घटनेनंतर दीपक कुमारने एक व्हिडिओ संदेश जारी करून लोकांना प्रेमाचा संदेश दिला. तो म्हणाला, "मी हिंदू, मुस्लीम, शीख किंवा ख्रिश्चन असण्याआधी एक माणूस आहे. मृत्यूनंतर मला देवाकडे माणुसकीचा हिशोब द्यायचा आहे. आपल्या देशाला द्वेषाची नाही, तर प्रेमाची गरज आहे."
कोटद्वारची ही घटना सिद्ध करते की, समाजात द्वेष पसरवणारे कितीही असले तरी, माणुसकीसाठी उभे राहणारे 'दीपक' अजूनही तेवत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -