दौलत रहमान, गुवाहाटी
आसाममध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा केवळ मुस्लीम समुदायापुरतीच मर्यादित आहे का? की हा केवळ आपल्या पूर्वग्रहांचा परिणाम असून तो एक प्रचाराचा भाग आहे? आसाम सरकारने बहुपत्नीत्वावर बंदी घालणारा नवा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे प्रश्न आता अधिक महत्त्वाचे ठरले आहेत. या कायद्यानुसार उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असून, अशा विवाहांमुळे आर्थिक किंवा सामाजिक अडचणीत येणाऱ्या महिलांसाठी नुकसानभरपाई निधीचीही घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, मुंबईस्थित 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस' (IIPS) ने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, बहुपत्नीत्व (Polygyny) केवळ मुस्लिमांमध्येच नाही, तर आसाममधील हिंदूंसह इतर समुदायांमध्येही आढळते. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे ही प्रथा आता वेगाने कमी होत आहे.
आकडेवारी काय सांगते?
'आयआयपीएस'ने राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) तिसऱ्या (२००५-०६), चौथ्या (२०१५-१६) आणि पाचव्या (२०१९-२१) फेरीतील आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, आसाममधील बहुपत्नीत्वाचे प्रमाण गेल्या १५ वर्षांत ३.३ टक्क्यावरून २.४ टक्क्यावर आले आहे.
'एनएफएचएस-५' च्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये बहुपत्नीत्वाचे प्रमाण मुस्लिमांमध्ये ३.६ टक्के, हिंदूंमध्ये १.८ टक्के आणि इतर धर्मांमध्ये १.८ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे, चौथ्या सर्वेक्षणात इतर धर्मांमधील हे प्रमाण ०.९ टक्के होते, जे पाचव्या सर्वेक्षणात वाढले आहे.

जिल्हानिहाय आणि राज्यनिहाय तुलना
मध्य आसाममधील विश्वनाथ जिल्हा आणि दक्षिण आसाममधील करीमगंज जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक ४.२ टक्के आहे. हे दोन्ही जिल्हे देशातील सर्वाधिक बहुपत्नीत्व असलेल्या पहिल्या ४० जिल्ह्यांच्या यादीत आहेत. मात्र, या यादीत मेघालयातील 'ईस्ट जयंतिया हिल्स' जिल्हा (जिथे ख्रिश्चन बहुसंख्याक आहेत) अव्वल स्थानी आहे. येथील तब्बल २० टक्के विवाहित महिलांनी सांगितले की, त्यांच्या पतीला त्यांच्याशिवाय इतर पत्नी आहेत.
देशातील जाती समूहांचा विचार केला, तर अनुसूचित जमातींमध्ये (ST) बहुपत्नीत्वाचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेत सर्वाधिक आढळले आहे. अनुसूचित जमातींमधील हे प्रमाण ३.१ टक्क्यावरून (NFHS-3) २.४ टक्क्यापर्यंत (NFHS-5) खाली आले आहे. अनुसूचित जातींमध्येही (SC) हे प्रमाण २.२ टक्क्यावरून १.५ टक्क्यावर घसरले आहे.
शिक्षण आणि भूगोलाचा प्रभाव
अभ्यासात असेही दिसून आले आहे की, ज्या महिलांकडे कोणतेही औपचारिक शिक्षण नाही, त्यांच्यामध्ये बहुपत्नीत्वाचे प्रमाण सुशिक्षित महिलांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच नागरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही प्रथा अधिक प्रमाणात दिसून येते. ईशान्य भारतातील मेघालय आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये बहुपत्नीत्वाची प्रकरणे नोंदवण्याचे प्रमाण देशाच्या इतर भागांच्या तुलनेत जास्त आहे.
आसामचा नवा कायदा
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आसाम विधानसभेने 'आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक कायदा, २०२५' मंजूर केला. या कायद्याचा उद्देश राज्यातील बहुपत्नीत्वाची प्रथा पूर्णपणे नष्ट करणे हा आहे. मात्र, सहाव्या अनुसूचीतील (Sixth Schedule) आदिवासी भागांना या कायद्यातून वगळण्यात आले आहे. आसाममधील बहुतांश मुस्लीम महिलांनी या कायद्याचे स्वागत करत त्याला 'पुरोगामी' म्हटले आहे, तर समाजातील एका गटाने हा कायदा केवळ एकाच विशिष्ट धर्माला लक्ष्य करणारा नसावा, अशी भूमिका मांडली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -