भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय तणावाचा फटका आता क्रिकेटला बसू लागला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचा आगामी बांगलादेश दौरा तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सीमेपलीकडील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बीसीसीआयने हा पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याशिवाय भारतीय संघ बांगलादेशला जाणार नाही, अशी भूमिका मंडळाने स्पष्ट केली आहे. पाकिस्तानप्रमाणेच आता बांगलादेशसोबतचे द्विपक्षीय क्रिकेट संबंधही संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) नुकतेच त्यांच्या आगामी वेळापत्रकाची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. मात्र, बीसीसीआयने या मालिकेला अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. बांगलादेशातील अस्थिर राजकीय वातावरणामुळे बीसीसीआयने सावध भूमिका घेतली आहे. या मालिकेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआय भारत सरकारशी चर्चा करणार आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्यासच हा दौरा निश्चित होईल, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षीही भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला नव्हता. आताही परिस्थिती तशीच राहिल्यास हा दौरा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही परदेश दौऱ्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे सरकारचा निर्णय अंतिम असेल. तोपर्यंत बीसीसीआय बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कोणताही अधिकृत प्रतिसाद देणार नाही.
विश्वचषक स्पर्धेवर परिणाम?
फेब्रुवारी महिन्यात भारत आणि श्रीलंकेत टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी मात्र बांगलादेशचा संघ भारतात येऊ शकतो. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) स्पर्धा असल्याने यात सहभागी होण्यास अडचण येणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, द्विपक्षीय मालिकांचे भवितव्य आता पूर्णपणे केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असणार आहे.